पुणे पोलिसांनी वाढवली डिजिटल पासच्या तारखेची मर्यादा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा बंदी करण्यात आली. अत्यावश्यक कारणासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पास आवश्यक करण्यात आला होता. मात्र, आता 1 ऑगस्ट नंतर प्रवासासाठी पासची आवश्यकता लागणार आहे की नाही, याबाबत अद्याप पोलिसांकडे स्पष्टता आलेली नाही. दुसरीकडे पोलिसांच्या डिजीटल पासची उपलब्ध होण्यासाठीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वेगवेगळ्या जिल्ह्यात व अन्य राज्यात जाणे सोपे व्हावे, यासाठी डिजीटल पासची सुविधा देण्यात आली होती.

लॉकडाऊन जसजसा वाढेल तसतसे डिजीटल पासची मर्यादा वाढवण्यात आली होती. संचार मनाई आदेशाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर नागरिकांची अन्य जिल्ह्यात व राज्यात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, 31 जुलै नंतर निर्बंध आणखी शिथिल होणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे प्रवासासाठी पासची गरज लागणार की नाही, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे म्हणाले, नागरिकांना ऑगस्ट महिन्यांपासून प्रवासासाठी डिजिटल पास देण्याबाबत अद्याप राज्य सरकारचे स्पष्ट आदेश आलेले नाहीत. गुरुवारी सायंकाळी किंवा शुक्रवारपर्यंत याविषयीची स्पष्टता येईल. दरम्यान, पुणे पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या डिजिटल पासची मर्यादा वाढवण्यात आली आहे. नागरिकांना पास देण्यात येत आहेत.