पुणे पोलिसांकडून ‘एक्स्ट्रा’ अ‍ॅपव्दारे पहिला FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारावर नजर ठेवण्यासाठी सुरू केलेल्या “एक्स्ट्रा” (“ट्रॅकिंग ऑफ इक्सटरनेस” (फेस रेडिंग)) या अ‍ॅपद्वारे पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात या उपक्रमाची सुरुवात पुणे शहर पोलिसांनी केली होती. त्यानुसार तडीपार काळात शहरात आलेल्या गुन्हेगाराला पकडण्यात आले. दरम्यान कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एच.क्यु.टी.एस. (होम क्वाराटाईन ट्रॅकिंग सिस्टीम) हे अ‍ॅप तयार करण्यात आले. त्याच धरतीवर पुणे पोलिसांनी हे अ‍ॅप सुरू केले आहे.

पुणे पोलिसांनी सध्यस्थिती जवळपास 300 हुन अधिक गुन्हेगारांना शहरातून तडीपार केलेले आहे. मात्र तडीपार गुन्हेगार तडीपारी काळात देखील शहरात येऊन गुन्हे करत असे. त्यामुळे पोलिसांची कारवाई म्हणजे कागदोपत्री राहायची. अनेक गंभीर गुन्हे तडीपार काळात झाले आहेत. त्यामुळे पोलिसांचा मूळ उद्देशच साध्य होत नसत. पोलिसांना कामे सोडून या तडीपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवावे लागत. त्यामुळे याला लगाम कसा लावता येईल, याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यांच्या संपर्कात आलेल्याना घरीच होम क्वाराटाईन केले जात. मात्र तरी देखील काहीजण बाहेर पडत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेत एच.क्यु.टी.एस. (होम क्वाराटाईन ट्रॅकिंग सिस्टीम) हे अ‍ॅप तयार करण्यात आले.

आता पुणे पोलिसांनी याची मदत घेऊन “एक्स्ट्रा” हे अ‍ॅप तयार केले. त्यानुसार तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांच्या मोबाईलमध्ये ते डाऊनलोड करून त्यांना दररोज फोटो टाकण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्याच्यावर पाळत ठेवली जात असे. दरम्यान परिमंडळ पचमधील बिबवेवाडी पोलिसांनी शंकर उर्फ बाबू कैलास पंधेकर (वय 22) याला 17 जून 2020 रोजी शहरातून तडीपार केले होते. त्यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याला दररोज सेल्फी टाकण्यास सांगितले. तो 26 जूनपर्यंत सेल्फी टाकत असे.

मात्र 27 नंतर त्याने सेल्फी टाकणे बंद केले. त्याचवेळी तो शहरात आला असल्याचा अलर्ट पुणे पोलिसांना मिळाला. त्यानुसार पोलिसांनी गुगल मॅपवर त्याचा क्रमांक टाकून माहिती काढली असता तो बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच आला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याची माहिती काढण्यात आली. तसेच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला पकडण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी ही सुविधा सुरू केल्यानंतर प्रथमच तडीपार गुन्हेगारास पकडले असून, त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.