चांदणी चौकत टँकरमधून अ‍ॅसिडची गळती झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकासह तिघांवर FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – चांदणी चौकात टँकरमधून अ‍ॅसिडची गळती झाल्याप्रकरणी अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चार दिवसांपूर्वी रात्री हा प्रकार घडला होता. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. कंपनी मालक, मॅनेजर आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संजय विश्वनाथ हिरमुखे (वय ४०, रा. पनवेल) गजानन श्रीमंत बिराजदार (वय ३१, रा.कळंबोली, नवी मुंबई) आणि रवींद्र शिवाजी म्हस्के (वय ३१, रा. आष्टी, बीड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपुर्वी मुंबई-बंगलोर महामार्गावरील चांदणी चौकातून जाणाऱ्या टँकरमधून अचानक अ‍ॅसिडगळती सुरू झाली होती. टँकर खाली मोठा दगड आल्याने ही गळती झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना डोळ्याचा त्रास झाला होता. संबंधित टँकर कंपनीचे मालक संजय हिरमुखे यांचा आहे. त्यांच्या कंपनीत गजानन बिराजदार मॅनेजर आहेत. रवींद्र म्हस्के चालक आहेत. टँकरमधून अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड वाहतूक करताना तिघांनीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अ‍ॅसिड वाहतूक करताना योग्य खबरदारी न घेतल्याने गळती झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वारजे पोलिस करीत आहेत.