अपहृत व्यापाऱ्याची 6 तासात सुटका, दीड कोटीच्या रक्कमेसह पुणे पोलिसांकडून तिघांना अटक (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लवकर श्रीमंत होण्यासाठी मार्केटयार्ड येथील एका व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली होती. अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची पोलिसांनी केवळ सहा तासात सुटका करून तिघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून खंडणीची दीड कोटीची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्युनर आणि एक दुचाकी असा एकूण 1 कोटी 75 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कांतीलाल गणात्रा (वय-65 रा. सिटी पार्क सोसायटी, मार्केट यार्ड) असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

अजय बाळासाहेब साबळे (वय-24 रा. वडकी नाला, ता. हवेली, जि. पुणे), सुजित किरण गुजर (वय-24 रा. उरळी देवाची, ता हवेली), ओंकार श्रीनाथ वाल्हेकर (वय-20 रा. उरळी देवाची, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार अजय साबळे हा असून या गुन्ह्यातील अमीत पोपट जगताप (वय-20 रा. उरळी देवाची) हा फरार आहे. या गुन्ह्यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरु असून अजय साबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी दिली.

कांतीलाल गणात्रा हे गुरुवारी रात्री सरकारी गोडावून जवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचे काळ्या रंगाच्या फॉच्युनर कारमधून अपहरण केले. ही घटना पाहणाऱ्या एका नागरिकाने घटनेची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मार्केट यार्ड पोलिसांनी गणात्रा यांच्या घरी जाऊन चौकशी केली. दरम्यान आरोपींनी कांतीलाल गणात्रा यांच्या मोबाईलवरून मुलाला फोन करुन दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली. आरोपींनी खंडणीची दीड कोटी रुपयांची रक्कम चांदणी चौकात घेऊन येण्यास सांगितले. पोलिसांनी चांदणी चौकात सापळा रचून सुजीत गुजर आणि ओंकार वाल्हेकर या आरोपींना तात्काळ अटक केली. मात्र, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या साथीदारांनी खंडणीची रक्कम घेऊन फॉच्युनर गाडीतून पसार झाले.

अटक करण्यात आरोपींकडे केलेल्या चौकशीत या गुन्ह्यातील मुख्यसुत्रधार अजय साबळे आणि अमित जगताप असून ते पैसे घेऊन गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन अजय साबळे याला अटक करून खंडणीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि फॉर्च्युनर जप्त केली. आरोपींनी पैसे मिळाल्याची खात्री झाल्यानंतर कांतीलाल गणात्रा यांना खेड शिवापूर येथील शिंदेवाडी येथे सोडून दिले. आरोपींकडे चौकशी सुरु असून त्यांनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का ? याचा तपास सुरु आहे.

ही कारवाई सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, पोलीस उपायुक्त गुन्हे पंकज देशमुख, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल कलगुटकर, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 5 मधील मार्केट यार्ड, हडपसर, मुंढवा, वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी, गुन्हे शाखा, वाहतूक विभागातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Visit : Policenama.com