बड्या आयपीएस अधिकार्‍याच्या दबावामुळं पुणे पोलिसांना नाशिकहून ‘रिकाम्या’ हातानं परतावं लागलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार शिवसेनेच्या उमेदवारासमोर बंडखोरी करत नांदगाव मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले रत्नाकर ज्ञानदेव पवार यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात सुमारे दीड कोटींची फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पवार यांना अटक करण्यासाठी शनिवारी (दि.२६) सकाळी नाशिकमध्ये पुण्याचे पोलीस दाखल झाले, मात्र त्यांना ‘कर्तव्य’ न बजावता रिकाम्या हाती परतावे लागल्याने पोलीस व राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली होती.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पवार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांना नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेकडून तिकिट न मिळाल्याने शिवसेनेचे विजयी उमेदवार सुहास कांदे यांच्याविरूध्द बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांच्याविरूध्द आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्यादी मोहद्दीस महंमद फारूख बखला यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांचेही नाव आहे. मोहद्दीस हेदेखील पुण्याच्या एका बांधकाम व्यावसायिक कंपनीचे भागीदार आहेत.

तसेच त्यांची टुर्स अ‍ॅन्ड ट्रव्हल्सची स्वत:ची कंपनीही आहे. त्यांना फेब्रुवारी २०१७ साली संशयित अनिस वली महंमद मेमन (रा. कोंढवा खुर्द, पुणे) याने पवार दाम्पत्यासह अन्य संशयित रविंद्र राजविर सिंह, सोनिया रविंद्र सिंह (दोघे रा.कल्याणीनगर पुणे) प्रकाश पासाराम लढ्ढा, (रा.भाभानगर, द्वारका नाशिक), अशोक परशुराम अहिरे (रा. महात्मानगर, नाशिक,) यांच्यासोबत ओळख करून दिली. या सर्वांनी एकत्रित व्यवसाय करण्याच्या नावाखाली बखला यांना गंडा घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

कोंढव्याचे एक पथक शनिवारी नाशिकमध्ये पुन्हा येऊन धडकले. दरम्यान, नाशिकच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी संशयित पवार यांना बेड्या ठोकण्याच्या हालचालीही सुरू केल्या होत्या, मात्र अचानकपणे कारवाई थांबविली गेली आणि तपासी पथक पुन्हा रिकाम्या हाती पुण्याच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे नाशिक शहरातील पोलीस वर्तुळात तसेच राजकिय क्षेत्रात उलटसुलट चर्चा ऐकू येत होती.

या आर्थिक फसवणुकीत पवार दाम्पत्यास मुख्य संशयित आरोपी आहेत.पवार यांनी फिर्यादी बाखला यांना बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक करण्यास आकर्षक आमिष दाखवून भाग पाडले. सर्व संशयितांनी संगनमताने फसवणूकीच्या उद्देशाने १ कोटी ६४ लाख १६ हजार ३८७ रूपयांना गंडा घातल्याचे बाखला यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पवार यांच्याविरूध्द यापुर्वीही विविध गुन्हे दाखल असून पुणे, नाशिकच्या न्यायालयात खटले सुरू आहेत.

…. म्हणून पुणे पोलिसांना ‘रिकाम्या’ हातानं परतावं लागलं

पुणे पोलिसांचं एक पथक आरोपीला अटक करण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झालं. आरोपीपर्यंत पोहचलं देखील. एवढचं नव्हे तर आरोपीला ताब्यात देखील घेण्यात आलं. त्यानंतर मात्र एका बडया राजकीय नेत्यानं सुत्र हालवली. काही वेळातच एका अति वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यानं सुत्र हातात घेतली. ‘त्या’ आयपीएस अधिकार्‍यांनी थेट पुण्यातील संबंधित पोलिस उपायुक्तांशी संवाद साधला आणि त्यांना योग्य ‘त्या’ सूचना दिल्या.

पुण्यातील उपायुक्तांनी आरोपींना ताब्यात घेतलेल्या पोलिसांना आरोपीला सध्या अटक करू नका, त्यांना केवळ नोटीस द्या असा आदेश दिला. त्यानंतर पुणे पोलिस नाशिकहून रिकामे हात हलवत आले. दरम्यान, हे प्रकरण एवढं गंभीर आहे की प्रकरणातील फिर्यादी आणि इतरांनी पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांनी काही दिवसांपुर्वीच भेट घेतली होती. असे असताना देखील एका अति वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍याच्या दबावामुळं पुणे पोलिसांना आरोपींना अटक करता आले नाही. त्या वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यानं असं का केलं आणि ते आयपीएस अधिकारी कोण याबाबत पोलिस दलामध्ये उलट-सुलट चर्चा चालु आहे.

 

Visit : policenama.com