पुणे : विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन फिरणार्‍यांची वाहने जप्त, सिंहगड रस्त्यावर कारवाई सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतात जवळपास सर्वच राज्यात कोरोनाचा हाहाकार चालू आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळं 30 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 215 वर जाऊन पोहचली आहे तर आतापर्यंत महाराष्ट्रात 10 जणांचे बळी गेले आहेत. आज (सोमवार) दुपारी पुण्यात एका 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळं खासगी रूग्णालयात मृत्यू झाला आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् आणि सह पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी यांनी पुणेकरांना घराबाहेर विनाकारण न पडण्याचे वेळोवेळी आवाहन केले आहे. तरी देखील काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असून आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे. रस्त्यावर विनाकारण वाहने घेऊन फिरणार्‍यांची वाहने जप्त केली जाणार आहेत.

सिंहगड रस्त्यावर अशा प्रकारची कारवाई सुरू करण्यात आली आहे. कलम 188 नुसार वाहने जप्त करण्यात येत आहेत. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नंदकिशोर शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर फिरणार्‍यांची वाहने जप्त करून त्यांना नोटीस बजावत आहेत. आता या कारवाईला सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर कोणीही फिरू नये तसेच वाहनावरून विनाकारण कोणीही दिसू नये असे आवाहन करण्यात आले आहे.