Pune : सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेतील रॅलीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आक्रमक, 100 जणांची येरवडा जेलमध्ये रवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हेगाराच्या अंत्यविधीची दुचाकी रॅली काढण्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर आक्रमक होत पोलिसांनी 100 जणांना पकडत त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. तर 50 हुन अधिक दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसनामाने अंत्यविधीचे व्हिडीओसह वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर शहर प्रचंड खळबळ उडाली होती.

सहकारनगर परिसरात राहत असलेल्या गुन्हेगार माधव वाघाटे (वय 27) याचा बिबवेवाडीत कडकडीत सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये टोळक्याने दगडधोंडे अन तीक्ष्ण हत्याराने वारकरून खून केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करत खून करणाऱ्या चौघांना पकडले गेले होते.

वाघाटे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. तर तो एका टोळीचा सदस्य देखील होता. त्याचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी या परिसरात गर्दी केली आणि त्याच्या अंत्यविधीची रॅलीच काढली. या रॅलीत जवळपास दीडशे दुचाकी अन 200 तरुण सहभागी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या घराच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान या अंत्यविधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

याची बातम्या प्रसार माध्यमातून व्हिडीओसह प्रसिद्ध झाल्याने पुणे पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली गेली. कारण, इतकं कडकडीत लॉकडाऊन सुरू असताना एका गुन्हेगाराचा एकतर मध्यरात्री टोळके खून करते. ते आरोपी अटक होत नाही; तोपर्यंत या गुन्हेगाराची अंत्ययात्रा नियम धाब्यावर बसवत त्याच्या चाहत्यांनी दुचाकीवर काढली. हे सर्व प्रकरण समोर आल्यानंतर मात्र पोलिसांनी मग आक्रमक होत या तरुणांची धरपकड करत रात्री आणि आज दिवसभरात 96 जणांना पकडत त्यांना अटक केली. तर 50 हुन अधिक दुचाकी देखील जप्त केल्या. आता उर्वरित तरुणांची धरपकड सुरू आहे. या सर्वांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.