वरिष्ठ पोलीस निरीक्षकानं मारला पुण्यातील जेष्ठ नागरिकाच्या फ्लॅटवर ताबा आणि घेतले 70 लाख, पीआयला अटक झाल्याने प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी एका जेष्ठ नागरिकाचा बळजबरीने फ्लॅटचा ताबा मिळवून 70 लाख रुपये घेतले होते. त्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सध्या ते विशेष शाखेत कार्यरत होते.

रौफ शेख (वय 55) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांच्यावर 2017 मध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांना अटक झाली नव्हती. या गुन्ह्याचा तपास सायबर व आर्थिक गुन्हे शाखेकडे होता. तो गुन्हा वरिष्ठांच्या आदेशानुसार रौफ शेख यांच्याकडे तपासासाठी देण्यात आला होता. मात्र यावेळी रौफ शेख यांनी या गुन्ह्यातील आरोपी आणि आताचे तक्रारदारास अटक न करण्यासाठी त्यांच्याकडून 70 लाख रुपये आणि खडकी परिसरातील जवळपास दीड कोटी रुपयांचा फ्लॅट मागितला. त्यांनी पैसे घेतले आणि फ्लॅटचा ताबा देखील घेतला. मात्र त्यांनतर देखील तक्रारदारास रौफ शेख यांनी अटक केली. तक्रारदार अटक झाले. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. यानंतर दोन महिन्यांनी त्यांना जामीन मिळाला.

त्यानंतर हे तक्रारदार थेट पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम यांच्याकडे गेले आणि त्यांनी दोन पाणी अर्ज लिहून सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी आयुक्तांनी तात्काळ रौफ शेख यांच्या चौकशीचे आदेश दिले. सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांचायकडे ही अर्ज चौकशी गेल्या 4 महिन्यापासून सुरू होती. त्यानुसार त्यांनी 70 लाख आणि फ्लॅट घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रौफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.