पोलीस सोसायटीकडून 5 लाखांची मदत देणार, कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूची लागण होऊन त्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास दी पूना डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप क्रेडीट सोसायटीकडून 5 लाखांची मदत देण्यात येणार आहे. सोसायटीचे सभासद असणे आवश्यक आहे. पोलीस सोसायटीचे शहर आणि जिल्ह्यात १३ हजार पोलीस कर्मचारी सदस्य आहेत. तसेच सोसायटीकडून घेतलेले कर्जही माफ करण्यात येणार आहे तसेच त्याचा अंत्यविधीचा खर्च सोसायटी करणार आहे.

दी पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप क्रेडिट सोसायटीचे पुणे शहर, पिंपरी शहर, ग्रामीण पोलीस, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी),लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) बिनतारी संदेश विभाग (वायरलेस) अशा घटकात कार्यरत असलेले १३ हजार पोलीस सोसायटीचे सभासद आहेत.

या सोसायटीच्या सभासदाना त्वरीत बारा लाखांचे कर्ज मंजूर केले जातात. शासकीय कर्मचाऱ्यांना दोन टप्यात वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस सोसायटीकडून कर्ज घेतलेल्या पोलिसांचे पुढील दोन महिन्यांचे हप्ते स्थगित करण्यात आले आहेत. कर्ज घेणारा पोलीस पुढील दोन महिन्यानंतर त्याच्या सोईने हप्ते भरू शकतो एखाद्या पोलिसाचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास त्याला कर्जमाफ करण्यात येते.

दरम्यान अंत्यविधीसाठी सोसायटीकडून कुटुंबीयांना दहा हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. समभागाची रक्कमदेखील परत केली जाणार आहे. करोनाचा संसर्गाला अटकाव घालण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत पोलिस कायदा-सुव्यवस्था सांभाळणे तसेच सामान्यांना मदत करण्याचे काम करत आहे. पोलिसांच्या कामाचे स्वरुप वेगळे आहे. तो नागरिकांच्या थेट संपर्कात असतो. बंदोबस्तात असलेल्या पोलिसाला करोनाचा संसर्ग झाल्यास त्याचा विमा सरकारकडून उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस सोसायटीचे सभासद असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती दी पूना डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी दिली.