Lockdown : पुण्यात लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत 15 हजाराहून अधिक जणांवर कारवाई, 34 हजार वाहने जप्त

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –   संचारबंदीत देखील विनाकारण बाहेर फिरणाऱ्या जवळपास 15 हजारहून अधिक नागरिकांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तर वाहने रस्त्यावर अण्यास मनाई असताना वाहने घेऊन फिरताना केलेल्या कारवाईत 34 हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. तर 27 एप्रिल परियंत शहरात कर्फ्यु लावला आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. तर वाहने देखील रस्त्यावर अण्यास मनाई केली आहे. याबाबत सतत पोलीस सूचना देत आहेत. मात्र पोलिसांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करीत अनेक नागरिक विनाकारण फिरत आहेत. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. तर थेट वाहन जप्तीची कारवाई केली जात आहे.

मध्यवर्ती भागात जाण्यासाठी किंवा शहराच्या दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी विविध मार्गाचा वापर करावा लागतो. त्यानुसार पोलिसांनी स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर, हडपसर, कात्रज, फरासखाना, विश्रामबाग, कोथरूड, चतु: श्रुंगी, वारजे, उत्तमनगर, वानवडी, कोरेगाव पार्क, अलंकार, समर्थ, बंडगार्डन परिसरात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांना बाहेर पडण्यास परवानगी दिली आहे. परंतु नागरिक किरकोळ कारणासाठी देखील नागरिक बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यानुसार पोलिसांनी शहरात संचारबंदी लागू झाल्यापासून १५ हजारांवर नागरिकांवर कारवाई केली आहे. संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. तर पोलिसांनी विविध भागात कारवाई करून ३४ हजार ४२ वाहने जप्त केली आहेत.

—चौकट—

तरीही शहरात गर्दीच…

शहरात पोलिसांनी कर्फ्यु लावल्यानंतर देखील शहरातील विविध भागात भाजीपाला किंवा वेगवेगळ्या कारणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहे. नागरिक सकाळी आणि सायंकाळी आपआपल्या परिसरात फिरतात.

कोरोनामुळे लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी घरात बसून पोलिसांसह प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही शहरातील काही भागात नागरिकांकडून विनाकारण फिरण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. अशा सर्व नागरिकांविरुद्ध १८८ नुसार कारवाई सुरू आहे. तसेच त्यांचे वाहनही जप्त करण्यात येत आहे.

– बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त