पुण्यात विनाकारण फिरणार्‍या 2000 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना विनाकारण भटकंती करणाऱ्यांवर पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली असून, एका दिवसात 2 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असून, नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियम लागू केले आहेत. परंतु या नियमांकडे दुर्लक्षकरत अनेकजण बाहेर पडताना दिसत आहेत. त्याचा ताण प्रशासनावर येत आहे. त्यामुळे आता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून पोलिसांकडून बेशिस्तांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कारवाईसाठी २७८ अधिकाऱ्यांसह १ हजार १९६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार विनाकारण भटकंती, विनामास्क प्रवास, ट्रीपल सीट, सिग्नल तोडणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

विशेष म्हणजे, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार काल १९७ ठिकाणी नाकाबंदी करुन 2 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी काल केलेली कारवाई…

विनापरवानगी संचार – ४४५
विनामास्क संचार – ५३६
संचारबंदीतील नागरिकांवरील कारवाई-४४५
वाहने जप्त- ३८
ट्रीपल सीट-४९
सिग्नल तोडणे आणि विरुद्ध दिशेने प्रवास-२३६
कलम १८८ नुसार कारवाई-३८६
बेदरकारपणे वाहन चालविणे-३६