पुण्यात घर भाड्यासाठी भाडेकरूकडे तगदा लावणार्‍या मालकावर पोलिसांकडून मोठी कारवाई, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन काळात घर मालक सक्तीने घरभाडे वसुल करीत असल्याचे दिसून आले असून, मध्यवस्तीत एका विद्यार्थिनीला घर भाडे दे नाही तर घर सोड असा तगादा लावणाऱ्या घर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे घर भाड्यासाठी तगादा लावल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.

कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यानंतर सर्व आस्थापना बंद आहेत. त्यामुळे कामे देखील बंद आहेत. अशास्थितीत अनेकांचे रोजगार बंद पडले आहेत. त्यांना आर्थिंक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरीही शहरात घर मालकांकडून घरभाड्यासाठी तगादा लावला जात आहे. भाडे देत नसल्यास घर रिकामे करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यानुसार आता घरमालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

मध्यवस्तीत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या मेघा बोथरा या विद्यार्थिनीला घर मालक घर भाडे देण्यासाठी सतत तगादा लावत होता. या विद्यार्थिनींने पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे तक्रार केली होती. संबंधित विद्यार्थिनी स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी चंद्रपूर येथून नवी पेठ येथे श्रेया लीमन यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत. लॉकडाऊनमुळे बोथरा घरमालक लिमन यांना दरमहिन्याचे घरभाडे देऊ शकत नव्हती. मात्र, तरीही घर मालक लिमन यांनी तिच्याकडे भाड्यासाठी तगादा लावत रूम खाली करण्यास धमकाविले होते.

लॉकडाउन काळात कोणत्याही घरमालकाने भाडेककडून सक्तीने घर भाडे वसूल करू नये. किमान तीन महिने वसुली पुढे ढकलावी अशा लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही लीमन यांनी बोथरा यांच्याकडून घर दुरुस्त करण्याचा बहाणा करुन घर खाली करण्यास भाग पाडल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लिमन यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.