Lockdown : पुण्यात संचारबंदीत शहरात 2 हजार 100 वाहने जप्त; 476 जणांवर FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शहरात संचारबंदी करण्यात आली असून रस्त्यावर वाहने घेऊन फिरण्यास मनाई केली आहे. मात्र तरीही अनेकजण बाहेर फिरत असून पोलिसांनी या कालावधीत तबल 2 हजार 135 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर 476 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता पोलिसांनी मॉर्निंग वॉक आणि विनाकारण पायी फिरणाऱ्यावर देखील कारवाई सुरू केली आहे. अनेकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. पोलीस सतत बाहेर पडू नका अशा सूचना देत आहेत. मात्र पोलिसांच्या सुचनेकडे दुर्लक्षकरत विनाकारण अनेकजण फिरत आहेत. दरम्यान रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कडक कारवाई केली जात आहे.

त्यानुसार गुन्हे दाखल करणे आणि थेट वाहन जप्तीची कारवाई केली जात आहे. नागरिकांकडून मध्यवर्ती भागात जाण्यासाठी किंवा शहराच्या दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी स्वारगेट येथील जेधे चौकातून पुढे जावे लागते. त्यादृष्टीने स्वारगेट पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून चौकातच नागरिकांना अडविण्यात येत आहे. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे बाहेर फिरण्याचे कारण विचारल्यानंतर त्यांच्याकडून किरकोळ प्रकारची कामे करण्यासाठी बाहेर पडल्याचे कारण सांगितले. एकाच दिवसात तब्बल २०० पेक्षा लोकांना अडविले होते. त्यापैकी पोलिसांकडून अधिकृत परवानगी घेतलेले व अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्ती वगळता ७० अधिक जणांविरुद्ध याप्रकरणी संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी हडपसर, बिबवेवाडी, चतु: श्रुंगी, सातारा रस्ता या ठिकाणी कारवाई केली आहे.

दरम्यान शहरात संचारबंदी लागू झाल्यापासून 2 हजार हजार 135 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर १८८ कलमानुसार शहरातील विविध भागात ४७६ नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मास्क न परिधान करता फिरणाऱ्या ७२ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यत आला आहे. लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी घरात बसण्याचे आवाहन केले आहे.