पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पकडली 39 लाखांची सिगारेट

पुणे :  पोलिसनामा ऑनलाइन –  राज्यात संचारबंदी असताना देखील छुप्या पध्दतीने मार्केटयार्ड परिसरात सिगारेटची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर खंडणी व अंमली विरोधी पथकाने छापा टाकला. त्याच्याकडून ३९ लाख रुपयांच्या सिगारेट पकडल्या आहेत.

शशिकांत रामस्वरूप चमाडिया ( वय ४३, रा. कोरेगाव पार्क )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही मार्केटयार्ड परिसरात असलेल्या चमाडिया ट्रेडिंग दुकानात सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक यांना मिळाली.
त्यानुसार खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून त्याठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवले. त्यावेळेस चमाडीया सिगारेटची विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. त्याच्याकडून ३९ लाखाचे ३७ सिगारेट बॉक्स जप्त केले.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक, संजय गायकवाड, एकनाथ कंधारे, पांडुरंग वांजळे, हनुमंत गायकवाड, विजय गुरव, सुनील चिखले यांच्या पथकाने केली.