पुण्यात किराणा मालाच्या दुकानात तंबाखूची विक्री ! विमाननगर आणि येरवडयात छापे, 5 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात संचारबंदी लागू झाल्यानंतर तंबाखूजन्य वस्तूंची जादा दराने विक्री सुरू असून पोलिसांनी विमाननगर व येरवडा येथील किराणा मालाच्या दुकानात छापा टाकून दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून 5 लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे.

मोहनसिंग मनरुपसिंग राजपुरोहित (वय ४६, रा. सोळंकी भवन, वडगाव शेरी) आणि सिराज समी शेख (वय २६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा ) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आल्यामुळे शहरातील सर्व आस्थापना बंद आहेत. मात्र, तरीही जादा पैेसे कमविण्याच्या हेतूने विमाननगर परिसरातील एक किराणा दुकानादार तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, मोहनसिंग जादा दराने तंबाखूची विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून १ लाख ७७ हजार रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला.

येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये असलेल्या एका बेकरीतून विदेशी सिगारेटची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाला पाठवून बेकरीमध्ये छापा टाकला. त्यावेळी सिराज शेख विदेशी सिगारेटची विक्री करीत असल्याचे दिसून आले. जादा पैसे कमविण्याच्या उद्देशाने विदेशी सिगारेटची बेकरीतून विक्री करीत असल्याची कबुली सिराजने दिली. पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.