Lockdown Pune : संचारबंदीत 550 जणांवर FIR, 1600 वाहने जप्त तर 1600 जणांना नोटिसा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी असताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांनी 541 जणांवर 188 नुसार खटले भरले आहेत. तर 1686 वाहने जप्त केली आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर, राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. पुण्यात नागरिकांना वाहने रस्त्यावर घेऊन येण्यास बंदी केली आहे. अत्यावश्यक असल्यास नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

मात्र त्यानंतरही अनेकजण विनाकारण दुचाकी घेऊन फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी गुरुवार (दि.२ एप्रिल) पर्यंत १ हजार २८७ जणांना नोटीस पाठविली आहे. तर ५६७ जणांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. तसेच शहरातील विविध रस्त्यांवर नाकाबंदी करीत १ हजार 686 वाहने जप्त केली आहेत.

नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचे पालन करावे, आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. तर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी शहरात सुमारे १२० ठिकाणी नाकाबंदी केली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई केली जात आहे.

दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या कमी व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल विक्री बंद केली आहे. तरीही या आदेशाने उल्लंघन करून पेट्रोल विक्री करणाऱ्या १९ पेट्रोल पंप चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यापूढे देखील ही कारवाई अशीच कारवाई केली जाणार आहे.