Lockdown : पोलिसांच्या पासेस मिळवण्यासाठी खोटी माहिती देणाऱ्यावर 6 जणांवर कारवाई

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – संचारबंदीत अत्यावश्यक सेवा तसेच मेडिकल कामांसाठी बाहेर पडण्यास देण्यात येणाऱ्या पासेमध्ये देखील खोटी माहिती देऊन पास घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी पास अश्या 6 जणांवर कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान पोलिसांकडे 3 लाख 18 हजार नागरिकांनी विनंती केली आहे.

याप्रकरणी 6 व्यक्तींवर 177 नुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर राज्यात संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. तर मेडिकल आणि किराणा दुकाने देखील सुरू आहेत.

याकाळात रुटिंग चेकअपसाठी रुग्णालयात जाण्यासाठी व अत्यावश्यक सेवा देणाऱ्यासाठी पुणे पोलिसांकडून पासेस देण्यात येत आहेत. त्यात कामाचे स्वरूप व इतर माहिती भरावी लागते. त्यांनतर पडताळणी करून पास दिला जातो.

या उपक्रमात तबल 3 लाख 18 हजार नागरिकांनी पासेस देण्याची मागणी केली आहे. त्यातील 1 लाख 7 हजार नागरिकांना हे पास देण्यात आले आहेत. त्यात उपचारसाठी सर्वाधिक पास दिले आहेत. तर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 47 हजार जणांना देखील परवानगी दिली आहे.

याचवेळी पुणे पोलिसांनी खोटी माहिती देऊन पास घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. यात 918 नागरिकांनी आधारकार्ड बाबत खोटी माहिती भरली होती. त्याची पडताळणी सुरू होती. त्यावेळी काही जणांवर पोलिसांना संशय आला. त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह यांनी तपास करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना दिल्या होत्या. त्यानुसार माहिती घेतली असता 6 जणांनी पासेस घेण्यासाठी खोटी माहिती दिली असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांच्यावर 177 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी आवश्यक असल्याच पास घ्यावेत. कोणीही खोटी माहिती देऊ नये. तसेच काही गरज लागल्यास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.