Pune News : पुणे शहरात येणाऱ्या 7 रस्त्यांवर होणार अचानक वाहन तपासणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी रात्रीची गस्त कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. गुन्हेगार रात्रीच्या वेळी गुन्हे करून शहराबाहेर पळून जातात. त्यामुळे पोलिसांनी पुणे शहरात येणाऱ्या सात रस्त्यांवर आठवड्यातून एकदा अचानक नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी गुन्हे करुन पळून जाणाऱ्या व शहरात येणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसणार आहे.

पुणे शहरामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून रात्रीच्यावेळी बंद घरांना चोरट्यांकडून टार्गेट केले जात आहे. चोरटे चोरीच्या वाहनांमधुन शहरात फिरुन चोरीचे गुन्हे करत असल्याचे आढळून आले आहे. तसेच चोरी करुन त्याच वाहनातून शहराबाहेर पळून जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली रात्र गस्त घातली जात आहे. प्रत्येक सहाय्यक पोलीस आयुक्त विभागात पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलची गस्त असते. मात्र आता या गस्तीबरोबरच पुणे शहराच्या सिमेवर कडक बंदोबस्त केला जाणार आहे.

या रस्त्यांवर होणार नाकाबंदी

पुणे शहरात प्रवेश करणारे सातारा रस्ता, बाणेर रस्ता, सोलापूर रस्ता, जुना पुणे-मुंबई रस्ता, नगर रस्ता, सिंहगड रस्ता आणि सासवड रस्त्यावर आठवड्यातून एकदा अचानक गस्त घातली जाणार आहे. यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसणार आहे. या सात रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात येणार असून या ठिकाणी वाहतूक शाखेचे एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच मुख्यालयातून दोन गनमॅनदेखील तैनात असणार आहेत. या रात्र गस्तीवर मुख्य नियंत्रण कक्षातून पोलीस निरीक्षक नियंत्रण ठेवणार आहेत.

फक्त संशयित वाहने तपासणार

नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी सर्व वाहने न तपासता संशयास्पद वाहने तपासावीत. लहान मुले, महिला असलेल्या वाहनांची गैरसोय होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी. वाहनचालकांकडे कागदपत्रे तपासावीत असे सांगण्यात आले आहे. तसेच शहरात रात्र गस्तीवर असलेले अधिकारी देखील नाकाबंदीच्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत. या पाहणीची माहिती नियंत्रण कक्षाला दिली जाणार आहे.

नाकाबंदीचा अहवाल उपायुक्तांना सादर केला जाईल

पुणे शहरात सात रस्त्यांवर करण्यात येणाऱ्या नाकाबंदीच्या रस्त्यावर मुख्यालयातून एक तंबू, खुर्चा, बॅटरी व इतर साधने पोहोचवली जाणार आहेत. पहाटे पाचनंतर ही साधने पुन्हा मुख्यालयात आणली जाणार आहेत. वाहतूक शाखेचे अधिकारी देखील घटनास्थळी बॅरिकेड, एलईडी बॅटन पुरविणार आहेत. वाहतूक शाखेचे कर्मचारी त्याचा वापर करतील. त्या दिवशी केलेल्या नाकाबंदीचा अहवाल दुसऱ्या दिवशी सायंकाळी उपायुक्तांना सादर केला जाणार आहे.