Coronavirus : धक्कादायक ! पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याला आणि पत्नीला ‘कोरोना’ची लागण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यास आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्मचारी वाहन चालक असून, त्याच्या संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.

शहरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदी लागू आहे. तरीही शहरात रुग्णांची संख्या 500 पार झाली आहे. या संचारबंदीत पोलीस 24 तास ऑन ड्युटी आहेत. प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. या कालावधीत पोलिसांच्या संपर्कात अनेकजण येतात. त्यामुळे पोलिसांना देखील तितकाच धोका निर्माण होतो. मात्र त्यासाठी सर्वांना मास्क, सॅनिटायझर आणि आवश्यक ती साधने देण्यात आली आहेत.

दरम्यान फरासखाना पोलीस ठाण्यातील कर्मचारी वाहन चालक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांवर तो चालक आहे. रविवारपासून तो नाईट ड्युटीवर असल्याचे सांगन्यात आले आहे. तो राहण्यास पिंपरी-चिंचवड परिसरात आहे. त्रास होऊ लागल्याने कर्मचाऱ्यास रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्याची व पत्नीची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी दोघांचे रिपोर्ट काल रात्री पॉझिटिव्ह आले आहेत.

फरासखाना पोलीस ठाण्यातील तसेच त्याच्या संपर्कात आलेल्यांची आता परियंत मिळालेल्या माहितीनुसार त्यांना विलगीकरणं करण्यात आले आहे. सर्वांची चाचणी करण्यात येणार आहे. सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. दरम्यान तो राहत असलेल्या ठिकाणी देखील परिसरात खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले आहे.