दुर्दैवी : पुणेकरांची काळजी घेणाऱ्या सहाय्यक उपनिरीक्षकालाच उपचारासाठी वणवण फिरण्याची वेळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या शहरातील पुणेकरांची काळजी घेणाऱ्या पुणे पोलीस दलातील कोरोना संशयित सहाय्यक उपनिरीक्षकालाच उपचारासाठी वनवन फिरण्याची वेळ आली. रुग्णालयाने नकार दिला अन दुसरीकडे जाण्यासाठी रुग्णवाहिकाही मिळाली नाही. त्यामुळे त्या पोलीसाचे कुटुंबीय 4 ते 5 तास रुग्णवाहिका आणि रुग्णालय शोधत होते. अखेर पत्रकारांनी ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर अपर आयुक्त, परिमंडळ दोनचे उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन त्या पोलीसास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलीस कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला होता. त्यांना श्वासनाचा त्रास होत होता. त्यामुळे दाखल केले होते. मात्र या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर रुग्णालये आणि रुग्णवाहिका वेळेत येण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे पोलीस दलातील एका पोलीस ठाण्यातील 4 पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित सहाय्यक उपनिरीक्षक देखील याच पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. दरम्यान ते दोन दिवसांच्या सुट्टीवर गेले होते. मात्र अचानक दुपारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे कुटुंबाने त्यांना तात्काळ मध्यवस्तीतील रुग्णालयात नेले. मात्र त्यांना व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगत दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी आणखी काही रुग्णालयात चौकशी केली. पण त्याठिकाणी देखील त्यांना हेच सांगण्यात आले. त्यामुळे हे कुटुंब पूर्ण घाबरून गेले. त्यांनी ही माहिती नातेवाईकांना दिली. त्यांनतर त्यांनी पुण्यातील काही पत्रकार मित्रांना माहिती देऊन मदत मागितली. त्यांनी देखील प्रयत्न केले. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला. मात्र त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे आणि सहायक आयुक्त शिवाजी पवार यांना ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन एका रुग्णालयाशी संपर्क साधला. तर एसीपी शिवाजी पवार यांनी त्या रुग्णालयात धाव घेऊन कुटूंबाला धीर दिला. तसेच एका रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र एका पोलिसावरच ही वेळ आल्याने सर्व पोलीस दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर त्यांचे कुटूंबिय देखील भीतीच्या छायेत आहेत.

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे. मात्र आता रुग्णालयातील साधनं, व्हेंटिलेटर आणि रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रुग्ण वाहिक अंडी त्यात डॉक्टर यंची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे आजच्या आलेल्या अनुभवावरून काही पोलिसांनी मत व्यक्त केले आहे. रुग्णवाहिका येण्यास नकार देतात कारण त्यात डॉक्टर नसतात. तसेच पूर्ण साधने ही नसतात असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामूळे प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा पुढील चित्र भयानक होणार अशी भीतीही व्यक्त केली आहे.

कारण, गेल्याच आठवड्यात फुटपाथवर पडलेल्या तरुणाला कोरोना झाला या संशयातूनच नेण्यास 6 तासांचा कालावधी लागला. त्याला कोणीही हात लावला नाही. त्यात अश्या प्रकारे अशी दुसरी घटना घडली आहे.