पुणे पोलीस दलातील ‘कोरोना’चा चौथा बळी, ASI दळवी यांचं निधन

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे पोलीस दलातील कोरोनाचा हा चौथा बळी आहे.

सुरेश सीताराम दळवी (वय 56) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सुरेश दळवी हे वाहतूक शाखेत नेमणुकीस होते. सिंहगड रोड वाहतूक विभागात कार्यरत होते. दरम्यान त्यांना अंगदुखी व अशक्तपणा आल्याने 14 ऑगस्ट रोजी त्यांची कोरोनाची तपासणी केली होती. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निधान झाले होते. त्यानंतर त्यांना लवळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

उपचारानंतर 29 ऑगस्ट रोजी त्यांना घरी सोडण्यात आले होते. तर 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांना श्वासनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना त्यांच्या भावाने रुग्णालयात दाखल केले होते. परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.

24 तास पुणेकरांसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पुणे पोलीस दलातील कोव्हीडमुळे हा चौथा बळी गेला आहे. यापूर्वी तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी लढताना दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.