‘त्या’ खूनाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह वडगाव पुलाखालील बंदीस्त पाण्याच्या पाईपलाईनच्या कॅनोलमध्ये १० ते १५ फूट खोल खड्ड्यात सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची खात्री पोलिसांना झाली. सिंहगड रोड पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना दोन दिवसात गुन्ह्याचा उलगडा करुन तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

मृतदेहाच्या उजव्या हातावर त्रिशुल, डमरु ओम व खांद्यावर शिव शंकर त्रिशूल गोंदलेले होते. एवढाच पुरावा पोलिसांकडे होता. या पुराव्यावरुन पोलिसांनी परिसरात तपास सुरु केला. तपासा दरम्यान एका कचरा मृत व्यक्तीचे नाव समजले. कचरा वेचकाने मृत व्यक्ती हा हरी उर्फ गुड्या असल्याचे सांगितले. तसेच घटनेच्या ठिकाणी काही मुले दारु पित बसतात अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तीन मुलांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांचे आणि मृत व्यक्तीचे दारु पिण्यावरुन सात ते आठ दिवसांपूर्वी भांडण झाले होते. घटनेच्या दिवशी अल्पवयीन मुले या ठिकाणी दारु पित बसले होते. त्यावेळी हरी त्या ठिकाणी आला. त्याने आणखी दारु आणण्यासाठी पैसे दिले. एकाने दारु आणली मात्र हरीचे पैसे दिले नाहीत. यावरुन त्यांच्यात वाद झाले. एकाने त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर इतर दोघांनीही त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. सिंहगड पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना आरोपींचा शोध घेऊन दोन दिवसात गुन्ह्याचा उलगडा केला.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग रविंद्र सेनगावकर, परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहीते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस उप निरीक्षक गिरीष सोनवणे, पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे, दयानंद तेलंगे पाटील, योगेश झेंडे, पुरुषोत्तम गुन्ला, रफीक नदाफ, यशवंत ओंबासे, संतोष सावंत, मयुर शिंदे, राहुल शेडगे, अविनाश कोंडे, सचिन माळवे, निलेश कुलथे, निलेश जमदाडे, किशोर शिंदे, प्रशांत काकडे, संदिप पवार यांच्या पथकाने केली.