पुणे: Pune Politics News | विधानपरिषदेच्या एका जागेसाठी भारतीय जनता पक्षात १९९० ला एकदाच बंडखोरी झाली होती. आणि त्यात बंडखोरांचा पराभव झाला होता. सन १९९० मध्ये विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून भाजपने प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांना उमेदवारी जाहीर केली. त्याआधी नारायण वैद्य (Narayan Vaidya) या जागेवरूनच आमदार झाले होते.
पक्ष आपल्याला उमेदवारी देईल या खात्रीत ते होते. मात्र, पक्षाने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. वैद्य बंडखोरी करून उभे राहिले, पण त्यांचा पराभव झाला. जावडेकर प्रथमच आमदार झाले. पक्षाने सगळी यंत्रणा त्यांच्या मागे उभी केली. बंडखोर वैद्य यांना फार प्रतिसाद मिळाला नाही.
बाकी १९५२ च्या निवडणुकीपासून पुण्यात विधानसभेच्या निवडणुकीला नाव घ्यावे अशी फार मोठी बंडखोरी झालेली दिसत नाही. काँग्रेस, कम्युनिस्ट, जनसंघ, हिंदुमहासभा हे प्रमुख राजकीय पक्ष होते. काँग्रेसचे वर्चस्व होते. कम्युनिस्ट त्यांच्याबरोबर स्पर्धा करत.
संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कम्युनिस्ट उमेदवाराने १९५७ च्या निवडणुकीत तो काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला कसबा विधानसभा मतदारसंघ हिसकावला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचे त्यावेळी वारे होते, पण त्यावेळीही समितीमध्ये किंवा काँग्रेस वा अन्य पक्षांमध्ये बंडखोरी झाली नव्हती.
पक्षाचा आदेश डावलून कार्यकर्ते अथवा पदाधिकाऱ्याने बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची परंपरा पुण्याला नाही. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश घेत निवडणूक लढण्याचा प्रकारही अगदी अलीकडचा आहे.
सन १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत मोहन धारिया (Mohan Dharia) जनता पक्षाकडून खासदार झाले, त्याआधी ते काँग्रेसकडून (Congress) निवडून आले होते, पण तो आणीबाणीच्या वावटळीतील पक्षबदल होता.