Pune : पूना मर्चंट्स चेंबर्सची ‘स्वस्त’ लाडू, चिवडा विक्री सोमवारपासून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –    ना नफा, ना तोटा तत्त्वावर बाजारभावातील निम्म्यापेक्षा कमी किमतीत बुंदीचे लाडू, चिवडा याची विक्री द पूना मर्चंट्स चेंबर्सतर्फे दरवर्षी दिवाळीत केली जाते. यंदाच्या वर्षीही हा उपक्रम चालू ठेवला असून येत्या सोमवार दिनांक नऊ नोव्हेंबर पासून शहरातील १२ ठिकाणी या पदार्थांची विक्री करण्यात येणार आहे. यंदा लाडू आणि चिवडा यांचा प्रत्येकी १३० रुपये किलो असा दर ठेवण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लाडू, चिवड्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली असली तरी भाव कमी ठेवण्यात आले आहेत असे चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले. हरभरा डाळ, साखर, तूप, तेल वगैरे वस्तू चेंबरचे सदस्यच देतात. पदार्थांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही त्यामुळे या पदार्थांना पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो. ओसवाल बंधू समाज कार्यालयात लाडू, चिवडा बनवण्यात येतो.

यंदा उपक्रमाचे ३३ वे वर्ष आहे. लोकांची प्रचंड मागणी असल्यामुळे हा उपक्रम यंदाही चालू ठेवला आहे. सध्याचा कोरोना साथीचा काळ लक्षात घेऊन पदार्थ बनविणाऱ्या सुमारे २०० जणांची रोज वैद्यकीय तपासणी करण्यात येते, शासनाच्या सर्व निर्बंधांचे पालन करुन पदार्थ बनविले जात आहेत असे चेंबरचे माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले यांनी सांगितले.