Pune : अलॉटमेंट लेटर वैध नसल्याने सदनिकेचा ताबा नाकारला; ‘महारेरा’चा निकाल, तक्रारदारांना त्यांची रक्कम मिळणार परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सदनिकेचे अलॉटमेंट लेटर देण्याचा अधिकार नसलेल्या व्यक्तीकडून लेटर घेऊन घरावर हक्क सांगणा-या व्यक्तीचा दावा महारेराने फेटाळला आहे. संबंधित दावा रेराने रद्द ठरवत बांधकाम व्यावसायिक कंपनीतील संचालकनाने घेतलेले पैसे तक्रारदारास निकालापासून एका महिन्याच्या आत परत करण्याचा आदेश दिला आहे. महारेराचे न्यायाधीश डॉ. विजय सतबीर सिंग यांनी दिला आहे.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, रमेश मेहता यांनी हॅमी कंस्ट्रक्शन प्रा.लि आणि संचालक रफीक जाफरानी, हसनेन रफीक जाफरानी आणि आरफाना रफीक जाफराणी यांच्याविरूद्ध दावा दाखल केला होता. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मेहता यांनी बिल्डरच्या हॅमी पार्क या गृहप्रकल्पात ३७ लाख ७१ हजार रुपयांची सदनिका बुक केली होती. त्यासाठी बुकिंग रक्कम म्हणून सात लाख रुपये दिले होते. या व्यवहाराचा करार आणि सदनिकेचे अलॉटमेंट लेटर घेण्यासाठी ते कंपनीच्या कार्यालयात गेले. तेव्हा त्यांना हसन रफीक जाफरानी यांनी अलॉटमेंट लेटर दिले.

बिल्डरने घेतलेले पैसे हे बुकींगपोटी नाही तर इतर कामांसाठी व्याजाने घेतले होते. मात्र मेहता यांनी व्याज वाढविल्याने त्याची परतफेड करणे अवघड झाले होते. त्यामुळे मेहता यांनी कंपनीवर दबाव टाकून पैशांच्या बदल्यात सदनिकेच्या एका अलॉटमेंट लेटरवर सही घेऊन कंपनीला नोटिसा पाठवायला सुरवात केली. तक्रारदाराने असे चित्र निर्माण केले की, सात लाख रूपयाची रक्कम कंपनीला हॅमी पार्कमधील प्लँटची बुकिंग रक्कम म्हणून दिली होती. तसेच अलॉटमेंट लेटरवर ज्यांची सही आहे, त्यांना तसे लेटर देण्याचा अधिकार नाही, असे बिल्डरकडून न्यायालयात सांगण्यात आले. बिल्डरच्या वतीने ॲड. गंधार सोनीस आणि ॲड अभिषेक जगताप यांनी कामकाज पाहिले.

निकालातील मुद्दे :

–  घराचा ताबा मिळण्यासाठी तक्रारदारांना सादर केलेले अलॉटमेंट लेटर हे वैध आहे, असे त्यांना सिद्ध करता आले नाही

–  त्यावर सही करणारी व्यक्ती ही कंपनीचा अधिकृत पदाधिकारी आहे की नाही हे तपासणे तक्रारदाराचे काम होते

–  रेराच्या संकेतस्थळावर जाऊन कंपनीचा संचालक कोण आहे, हे पाहणे तक्रारदाराचे कर्तव्य होते
–  स्वत:च्या चुकीमुळे त्याला महारेराचे दरवाजे ठोठावता येणार नाहीत