Fact Check : पुणे पोलिस आयुक्त म्हणून आशुतोष डुंबरेंची नियुक्ती झाल्याबद्दल सोशलवर पोस्टर ‘व्हायरल’, जाणून घ्या सत्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिस आयुक्त म्हणून आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती झाल्याचं एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहे. दरम्यान, या पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अतुल वल्लभशेठ बेनके यांच्याकडून डुंबरे यांचे अभिनंदन केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्ताधारी आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचं नाव पोस्टवर असल्यामुळे खरच की काय पुण्याला नवीन पोलिस आयुक्त मिळाले असाच समज नेटकर्‍यांना होत आहे. त्याबाबतचे अनेक फोन पोलीसनामाच्या कार्यालयात देखील आले आहेत. मात्र, गृह विभागाकडून पुणे पोलिस आयुक्तांच्या बदलीचे आजपर्यंत तरी अधिकृतपणे आदेश निघालेले नाहीत अशी माहिती गृह विभागातील विश्वसनीय सुत्रांनी पोलीसनामाला दिली आहे.

पोस्टरची सत्यता जाणून घेण्यासाठी पोलीसनामाने आमदार अतुल बेनके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या पोस्टरचा आणि माझा काही एक संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे पोस्टर कोणी प्रसारित केले आहे याबाबत देखील त्यांना कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, बदल्यांचा महिना असल्याने या पोस्टरची पुणे शहर पोलिस दलात प्रचंड चर्चा सुरू आहे.