Pune : नागरिकांना लस देण्यासाठी योग्य नियोजन करावे – प्रशांत सुरसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनावर कोशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस घ्या, असे शासन सांगत आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन केले आहे. सुरुवातीला 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिका, त्यानंतर 45 वयोगटापुढील सर्वांना लस देणे सुरू केले. अनेकांनी पहिला डोस घेतला. दरम्यान, 18 ते 44 वयोगटातील सर्वांना लस देणे सुरू केले. मात्र, 45 वयोगटातील पुढील अनेकांना पहिलाच डोस मिळाला नाही, तर ज्यांनी पहिली डोस घेतला, त्यांना दुसरा डोस मिळत नाही, अशी अवस्था उपनगर आणि परिसरात निर्माण झाली आहे. ऑनलाइन नोंदणी केली आहे, त्यांना केंद्र आणि वेळ दर्शविली जात असली तरी तेथे लस मिळत नसल्याने ज्येष्ठ आणि अपंग नागरिकांची कुचंबना होत आहे. प्रशासनाने योग्य नियोजन करून दररोज जास्तीत जास्त नागरिकांना लस द्यावी, अशी मागणी काँग्रेस शहर कमिटीचे सरचिटणीस प्रशांत सुरसे यांनी केली आहे.

सुरसे म्हणाले की, मागिल दोन महिन्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळत नाही, रेमडिसिव्हर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे, त्यामुळे नागरिक सैरभर झाले आहेत. आता कोरोनावर लस उपलब्ध झाली आहे. मात्र, नियोजन नसल्यामुळे लस घेण्यासाठी तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोविड लसीकरण केंद्रावरील टोकन पद्धत बंद करावी. पहिला आणि दुसरा डोससुद्धा ऑनलाइन पद्धतीनेच दिला पाहिजे. 18 वयोगटापुढील नागरिक आणि 45 वयोगटापुढील नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रत्येकाला लस देण्याचे नियोजन करण्याची अत्यंत गरज आहे. महापालिका प्रशासनाने 45 वयोगटापुढील नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस आणि 18 वयोगटावरील नागरिकांना लस देण्याचे स्वतंत्र नियोजन करावे. ज्यांना पहिला डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस देण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. कोरोनाचे भय वाढत असल्याने लस घेण्यासाठी नागरिक ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर वेळ आणि ठिकाण कळविले जात आहे. मात्र, लसीकरण केंद्रावरील अधिकारी कर्मचारी लस संपली आहे, गर्दी करू नका, घरी जावा, लस कधी मिळेल, कधी यायचे याची माहिती कोणी देत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ होऊ नये, म्हणून लसीकरण वाढवावीत आणि नियोजन असणे अत्यंत गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हडपसर-ससाणेनगरमधील शैलाताई माळी डीटीएड महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्ज्वला सावंत म्हणाल्या की, गाडीतळावरील बंटर बर्नाट शाळेत गेले, त्यावेळी तुम्ही मगरपट्टा चौकातील मगर रुग्णालयात जा, तेथे गेल्यानंतर तुम्ही पुन्हा नावनोंदणी करा. त्यानंतर मगरपट्टासिटीतील अडमीन कार्यालयात गेले, तेथील वॉचमनने सांगितले येथे फक्त 18 ते 44 वयोगटामधील नागरिकांनाच लस देण्यात येते. 45 वर्षांपुढील नागरिकांना लस घेण्यासाठी 20 एप्रिल 2021 वेळ दिली होती. मात्र, लस मिळविण्यासाठी हडपसरमधील अण्णासाहेब मगर रुग्णालय आणि हडपसर गाडीतळ येथील बंटर बर्नाड स्कूलमध्ये जा असे सांगितले जात आहे. दोन्ही ठिकाणी लस घेण्यासाठी आलेले नागरिकांची खच्चून गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. गर्दी कमी न करता कोरोनावर कशी मात करायची असा प्रश्न पडला आहे. लोकप्रतिनिधींची विनाकारण लसीकरण केंद्रावर लुडबूड असते. 18 ते 44 आणि 45 च्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण केंद्राचे नियोजन करावे. त्यातही पहिला आणि दुसरा डोस देण्यासाठी उपाययोजना झाली पाहिजे. मागिल 15 दिवसांपासून लस मिळविण्यासाठी दररोज चकरा मारत असून, कोणी दाद देत नाही. त्यामुळे लस मिळविण्यासाठी आता नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, माजी उपमहापौर निलेश म्हणाले की, मगर रुग्णालयामध्ये 18 ते 44 वयोगट आणि 45 च्या पुढील सर्व नागरिकांना अमानोरा, मगरपट्टासिटी, काळेपडळ येथील रोहन काळे मनपा रुग्णालय, अण्णासाहेब नगर रुग्णालयाचे उपकेंद्र सावली फाउंडेशन, ससाणेनगर, हडपसर-गाडीतळ येथील बंटर बर्नाट स्कूल, उरुळी देवाची, फुरसुंगी, मुंढव्यातील कोद्रे रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जात आहे. 45 वयोगटापुढील नावनोंदणी केली आहे, त्यांनी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. पालिकेकडून जसा पुरवठा होतो, त्याप्रमाणे लसीकरण केले जाते. जे अगोदर येतील, त्यांना लस प्रधान्यक्रमाने दिली जाते, वॉचमन रांगेतील नागरिकांची संख्या सांगतात, लस किती जणांना देता येईल, असे सांगितल्याचे त्यांनी म्हटले.