Pune : ICC ट्रेड टॉवरमधील जागा भाडेकरारने देण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीपुढे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी ट्रेड टॉवरमधील महापालिकेच्या ताब्यातील सुमारे ३३ हजार चौरस फूट जागेपोटी पाच कोटी ५५ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न देणार्‍या निविदा मंजुरीसाठी शहर सुधारणा समितीसमोर अखेर आल्या आहेत. स्मार्ट सिटी कंपनी आणि महापालिका यांच्या वादात गेल्या दीड वर्षापासून या रकमेवर पाणी सोडण्यात येत होते. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने ही जागा व्यावसायिक वापरास देण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्याचा अंतिम निर्णय मुख्य सभेत घेण्यात येणार आहे.

आयसीसी ट्रेड टॉवरमधील महापालिकेच्या मालकीचे दोन मजले असून, ते स्मार्ट सिटी कंपनीला द्यायचे की त्यांचा वापर व्यावसायिक कारणासाठी करून, त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळवायचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानुसार हे मजले व्यावसायिक वापरासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यासाठीची आवश्यक निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी ही जागा भाड्याने देण्यासाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविली. अखेरीस पाच कोटी ५५ लाख रुपये वार्षिक भाडे देणार्‍या कंपनीला या जागा भाड्याने देण्यासाठी करारनामा करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर ठेवण्यात आला आहे. गेल्या एक महिन्यांपासून हा प्रस्ताव प्रलंबित असून, येत्या आठवड्यात त्यावर निर्णय अपेक्षित आहे.

दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसन्न जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शहर सुधारणा समितीची आज पहिलीच बैठक झाली. या बैठकीमध्ये काही सदस्यांनी या प्रस्तावाची माहिती घेतली. मात्र, कुठल्याही कार्यवाहीशिवाय केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानिमित्त आजची बैठक तहकुब करण्यात आली आहे.