Pune : पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीच्या व्यवस्थापनाबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   वैकुंठ स्मशानभूमीतील परिसरातील धुरामुळे वाढते प्रदूषण, त्यासोबत परिसरात पसरणारी राख अशा स्मशानभूमीच्या अवैज्ञानिक व्यवस्थापनाविषयी चिंता व्यक्त करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. नवी पेठेतील रहिवासी विक्रांत धनंजय लाटकर यांनी ॲड असीम सरोदे, ॲड. अजित विजय देशपांडे व ॲड. अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

खुल्या स्मशानभूमी मुळे तसेच विद्युत दहिनीच्या चिमणीमधून बाहेर येणा-या तीव्र धुराचा प्रवाह उलट्या थराखाली दिसून येत आहे.

नवी पेठ. सदाशिवेपेठ, पर्वती पायथा, दांडेकर पूल वस्ती, फाटक बाग परिसर, रामबाग कॉलनी, लोकमान्य नगर, विजया नगर कॉलनी, दत्तवाडी गावठाण, सारसबाग इत्यादी या भागात विषारी धूर तसेच धुरातून येणारी घातक राख हवा प्रदूषित करत आहे. कोरोना संसर्गाने मरण पावलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे वाढलेले प्रमाण, अंत्यविधींमध्ये झालेली वाढ व दररोज १०० पेक्षा जास्त पार्थिवांचे दहन वैकुंठ स्मशानभूमीमध्ये होत आहेत. स्मशानभूमीच्या वरच्या बाजूला असलेल्या चिमणीने उत्सर्जित केलेल्या गडद व जाड धुरातून आसपासच्या परिसरातील हवा प्रदूषित होत आहे. धूर मानवी आरोग्यासाठी घातक आहे आणि त्याचा नकारात्मक परिणाम हृदय आणि फुफ्फुसांवर दिसून येतो. २५ आगस्ट २०२० मध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) ने पीएमसीविरूद्ध आदेश पारित केले असले, तरी त्यानुसार कार्य करण्यास महानगर पालिका संपूर्णत: अपयशी ठरली आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकेची सुनावणी बुधवारी (ता.१२) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुळकर्णी यांच्या समोर होणार आहे.

चिमणी व इतर इलेक्ट्रिकल व गॅस चेंबर्समधून धूर सोडण्याच्या व्यवस्थापनासाठी, चिमणीची उंची वाढविण्यासाठी, स्टॅकमध्ये थेट देखरेख स्थापित करण्यासाठी महापालिकेला उच्च प्रतीची उपकरणे तसेच उच्च स्टॅक चिमणी व इतर गॅस चेंबरमधून बाहेर काढण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अ‍ॅड. असीम सरोदे, याचिकाकर्त्यांचे वकील

त्रैमासिक आधारावर एमपीसीबीमार्फत स्मशानभूमीतील वातावरणीय बदल, हवेचा दर्जा यावर देखरेख ठेवावी. स्मशानभूमीच्या शेजारील रहिवासी भागात वास्तविक वायू प्रदूषण मीटर बसवावी. सार्वजनिक क्षेत्रातील मोजमाप आकडेवारी प्रकाशित करणे. पीएमसीने हवेचा दर्जा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवावी, – स्मशानभूमी मैदान दुस-या ठिकाणी हलवावे. वैकुंठ स्मशान इथे जाळण्यात येणा-या प्रेतांची संख्या मर्यादित ठेवणे. एकाच स्मशानवरील भार कमी करावा. राज्यातील स्मशानभूमीच्या व्यवस्थापनाबाबत वैज्ञानिक मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या जाव्यात.