पुण्यात ‘कोरोना’ वॉरियर्स शिक्षकांची कुचंबना ! 24 दिवसांच्या कामानंतर फक्त 3 दिवस सुट्टी, पुण्यात वेगळा अन् पिंपरीत वेगळा न्याय

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. देशात आणि महाराष्ट्रात देखील परिस्थिती बिकट आहे. पुणे शहरातील स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत कोरोना वारियर्स शिक्षक काम करीत आहेत. या कोरोनाशी सुरु असलेल्या लढाईत शिक्षकही कोरोना वॉरियर म्हणून मोलाची भूमिका बजावत आहेत. मात्र पुणे महानगरपालिकेकडून या कोरोना वॉरियर्सवर अन्याय होत असल्याची चर्चा सध्या शिक्षक वर्गामध्ये आहे. त्याबाबतचे मेसेज समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेत 14 दिवसांच्या कामानंतर 14 दिवस कार्यमुक्त केले जाते. तर पुणे महापालिकेत या शिक्षकांना 24 दिवसांच्या कामानंतर टार्गेट पुर्ण केले असेल तरच सुट्टी तीन दिवसांची सुट्टी असे परिपत्रक काढून त्यांची घोर थट्टा करण्याचे काम महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या ‘या’ मनमानीचा विशेषत: शिक्षिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत.

राष्ट्रीय आपत्ती प्रसंगी आपण आपल्या शहरासाठी योगदान दिले पाहिजे या भावनेतून आपण सर्व शिक्षकांनी सर्वेक्षणाचे काम स्विकारले. ज्या भागामध्ये बाधित रुग्ण सापडत होते. त्या भागात सर्वेक्षणाला पाठवलं जात होत. झोपडपट्टीत गेल्यावर नागरिकांचा विरोध, फॉर्म घेवून फाडणे, महिला सर्वेक्षकांना वाईट बोलणे, नीट माहिती न देणे अशा अनेक त्रासांना सामोरे जावे लागले. उच्चभ्रू सोसायटी मध्ये तर काही विचारूच नका. गेटमध्ये वॉचमनला भेटा, मग चेअरमनशी संपर्क करा. मग परवानगी घेवून गेटच्या आत जा. अशी दिव्य पार करत शिक्षक सर्वेक्षण करत आहेत. महिला सर्वेक्षाकांच्या समस्या तर याहून वेगळ्या. झोपडपट्टी असो वा सोसायटी असो वॉशरूमची व्यवस्था नसल्याने ६-७ तास लघुशंकेला जावू शकत नाहीत. सोय नाही म्हणून पाणी कमी पिले जात आहे.

त्यातून नवीन आजार उद्भवत आहेत. सुरक्षा म्हणाल तर मास्क, कधीतरी हँड ग्लोव्हज, दोघात एक सॅनिटायजर अशी दुरावस्था. अशा स्थितीत दररोज 100 घरे सर्वेक्षित होणे अशक्य आहे. त्यामुळे अनेकांचे टार्गेट पुर्ण झाले असेल असे नाही. सुरवातीला महिलांना या कामातून वगळावे अशी विनंती केली होती. कारण घरात कामवाली नाही, पाळणाघरे बंद, लहान मुलांना सांभाळण्याचा प्रश्न अशा अनेक समस्या महिलांच्या असल्याने महिला शिक्षकांना या कामातून वगळावे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना भेटून शिक्षकांनी विनंती केली. मात्र, या विनंतीचा अजिबात विचार केला गेला नाही असा आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

दररोज 100 घरांचे सर्वेक्षण करण्याचे काम दिले आहे. आज ज्यांचे 24 दिवस पुर्ण झाले आहेत आणि दररोज 100 घरांचे टार्गेट पुर्ण केले आहे. अशा शिक्षकांना 3 दिवस सुट्टीचे परिपत्रक काढण्यात आले. परंतु यातील एकाही शिक्षकाचे 2400 घरांचे टार्गेट पुर्ण झाले असेल असे वाटत नाही. त्यामुळे त्यांना काय तर 3 दिवसांच्या सुट्टीचा लाभ घेता येणार नसल्याचे दिसत आहे.

मात्र एकीकडे पुणे महानगरपालिकेत हे चित्र असताना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत कर्मचाऱ्यांना 14 दिवसांच्या कामानंतर कार्यमुक्त केले जात आहे. परंतु पुणे महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यानाच ही अन्यायकारक वागणूक मिळत असल्याची चर्चा सध्या मनपाच्या वर्तूळामध्ये आहे.