Pune : कर्ज मंजुर करण्याचे आमिष दाखवून पुण्यातील व्यावसायिकाची 32 लाख रुपयांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्ज मंजुर करण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यावसायिकाची 32 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरातील खासगी वित्तीय संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निलेश उपासनी (वय 48, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची भागीदारात खासगी कंपनी आहे. त्यांच्या कंपनीकडून रसायननिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार होता. त्यासाठी त्यांना कर्ज हवे होते. त्यामुळे त्यांनी ठाण्यातील या वित्तीय संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधला. उपासनी यांना 16 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून दिले जाईल, असे सांगण्यात आले.

त्यानंतर कर्ज मंजुर करण्यासाठी काही पैसे भरावी लागतील व काही मालमत्ता तारण ठेवावी लागेल, असे सांगितल्यानंतर उपासनी यांनी वेळोवेळी एकूण 32 लाख 38 हजार रुपये वित्तीय संस्थेच्या खात्यात जमा केले. त्यानंतर त्यांना ठाण्यात बोलविण्यात आले. संबंधित संचालकांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता तो बंद लागला. उपासनी यांनी माहिती घेतली असता त्यांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तक्रार दिली. अधिक तपास उपनिरीक्षक एल. आर. सातपुते तपास करत आहेत.