पुणे पोलिसांचा मोठा निर्णय ! ‘कोरोना’बाधित कर्मचार्‍यांना 10 हजाराचं ‘रिवार्ड’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलातील एखाद्या पोलिसास दुर्दैवाने कोरोनाची लागण झाल्यास त्या पोलिसास 10 हजाराचा रिवार्ड दिला जाणार आहे. तर आगाऊ रक्कम म्हणून 1 लाख रुपये बिगरव्याजी देण्यात येणार आहेत. पोलिसांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. रिवार्डची रक्कम पोलिस कल्याण निधीतून त्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.

शहर पोलीस दलातील 8 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या सर्वांना हा रिवार्ड देण्यात येणार आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पोलिस, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग चोवीस तास काम करत आहेत. शहरात नागरिकांनी बाहेर पडू नये यासाठी पोलिस रस्त्यावर उतरून काम काम करत आहेत. कर्तव्य पार पाडत असताना त्यांचा कोरोनाग्रस्तांशी संपर्क येतो. त्यामुळे पोलिसांना देखील त्याचा धोका निर्माण झाला आहे. पूर्ण योग्य ती काळजी घेतली जाते आहे. मात्र तरी देखील दुर्दैवाने काही पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्यांना योग्य ते तत्काळ उपचार मिळावेत म्हणून शहरातील काही रुग्णालयात पोलिसांसाठी बेड आरक्षित करण्यात आले आहेत.

दरम्यान पोलिसांना लागण झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली. तर काही प्रमाणात मनात भीती देखील होती. त्यामुळे मनोबल खच्ची होऊ नये यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न सुरू होते. त्याचाच भाग म्हणून जर दुर्दैवाने एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली तर त्यांना 10 हजाराचा रिवार्ड देण्यात येणार आहे. तसेच एक कौटुंबिक घटक म्हणून, एक पोलिसांची टीम कर्मचाऱ्याला स्क्रिनींगसाठी घेऊन जाईल. त्याला योग्य उपचार कसे मिळतील यावर लक्ष ठेवनार आहेत. पण, कर्तव्य पार पाडत असताना पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, तो टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात येत असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.