महापालिकेकडून वाहतूक पोलिसांना आणखी एक ‘दुकान’ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्यावर काम करण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी अनिवार्य करून महापालिका प्रशासनाने आणखी एक दुकानदारी सुरू करून दिली आहे. यामुळे वर्क ऑर्डर दिल्यानंतरही अनेक महिने उलटून ही कामे सुरूच होत नाहीत. प्रशासनाने पोलिसांच्या ना हरकत पत्राची अट काढून टाकावी, अशी मागणी आज सर्वपक्षीय सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली. सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यापुढे रस्त्यावरील कामांची माहिती वाहतूक पोलिसांना देण्याचे पत्र काढावे असे आदेश दिले.

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी यासंदर्भात सभेत चर्चा उपस्थित केली. ते म्हणाले, महापालिकेच्या वतीने विविध कामांसाठी रस्ते खोदाईची कामे केली जातात. परंतु अलीकडे रस्ते खोदाई करताना वाहतूक पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. पोलीस परवानगी केवळ काम सुरू असलेल्या ठिकाणच्या सुरक्षिततेसाठी असते. परंतु पोलिस संबंधित कामाच्या ठेकेदाराला बोलावून घेतात. त्यांच्याकडे सगळी कागदपत्र मागवून त्यांचे जबाब नोंदवतात. यानंतरही कामाची रक्कम पाहून ठेकेदारांकडे डिमांड करतात, किंवा त्यांना काम सुरू असलेल्या सरकारी आस्थापनांची ना हरकत प्रमाणपत्र मागवली जातात. परवानगी न घेतल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात.

वस्तुतः महापालिकेने काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक नियोजन करण्याच्या दृष्टीने पोलिसांना पत्र देणे अपेक्षित आहे. मात्र, पालिकेने पोलिसांना आणखी एक दुकानदारी उघडून दिली असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. डॉ. सिदार्थ धेंडे म्हणाले, बंडगार्डन जुना पूल धोकादायक असून त्याच्या दुरुस्तीचे टेंडर काढले आहे. परंतु एक वर्षांपासून पोलिसांच्या परवानगी अभावी हे काम रखडले आहे.

पृथ्वीराज सुतार म्हणाले, ठेकेदार महापालिकेचे काम करत असतात. त्यामुळे कामांबाबत पालिकेनेच पोलिसांना कळवणे अपेक्षित आहे. गफूर पठाण यांनी पोलीस कामाच्या ठिकाणी न जाताच ना हरकत प्रमाणपत्र देतात. यावर विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे, वसंत मोरे यांची देखील भाषणे झाली.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, की वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या कामात अडथळा आणू नये यासाठी पोलीस आयुक्तांसोबत बैठक घ्यावी. पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. ही कामे सुरू असताना पालिकेने वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने पोलिसांना कळविणे अपेक्षित आहे. तसे परिपत्रक काढावे, असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले.

 

फेसबुक पेज लाईक करा –