Pune : ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून पुणे महापालिकेने उचलले ‘हे’ मोठे पाऊल, आयुक्त विक्रम कुमार म्हणाले – ‘बेल्लारी येथूनही ऑक्सिजन मागविला’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनची गरज मोठया प्रमाणावर वाढली आहे. ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी दळवी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यास मान्यता देण्यात आली असून कर्नाटकातील बेल्लारी येथूनही ऑक्सिजन मागवण्यात येत आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठ्यात समन्वय ठेवण्यासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून ऑक्सिजन वाहतुकीसाठी पालिकेने 3 टँकर ही भाडेतत्वावर घेतले आहेत ,अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने ऑक्सिजन पातळी खालावल्याने मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. आजमितीला साडेपाच हजार रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे एकट्या पुणे शहराची ऑक्सिजनची गरज 300 टन वर पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यातील विविध कंपन्यामध्ये दररोज 380 टन ऑक्सिजन निर्मिती होते. यापैकी सुमारे 80 टन ऑक्सिजन हा विदर्भ, मराठवाड्याला जातो. तर पुणे जिल्ह्याला कट टू कट पुरवठा होत असल्याने रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यात अडचणी येत आहेत.

यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बेडसची संख्या वाढवत असतानाच ऑक्सिजन चा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कर्नाटकातील बेल्लारी येथील कंपनीला 100 टन ऑक्सिजन पुरवठ्याची ऑर्डर देण्यात आली आहे, तसेच जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट वरून ऑक्सिजन आणण्यासाठी अनुक्रमे 9, 5 आणि 3 टन क्षमतेचे टँकर भाड्याने घेतले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

राज्य शासनाने आमदार फंडातून एक कोटी रुपये कोरोना उपचारासाठी खर्च करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी एक कोटी तर भाजप नगरसेवकांच्या स यादीतून एक कोटी रुपये उपलबद्ध करून शिवाजीनगर रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट उभारण्यात येणार आहे. याठिकाणी 170 बेड्स आहेत. युद्धपातळीवर हा प्लांट उभारून या रुग्णलायातील ऑक्सिजनची गरज भागवण्यात येईल. आयुक्तांनी याला आज मान्यता दिली, अशी माहिती सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.