Pune : पुणे मनपाकडून कडक निर्बंधाबाबत सुधारित आदेश जारी ! ‘या’ आस्थापनांवरील कर्मचार्‍यांना कोविड-19 टेस्टपासून सूट; वाईन शॉप्सबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पुण्यात विकेंड लॉकडाऊन (शनिवार आणि रविवार) लागू करण्यात आला आहे तर राज्य सरकारने संपुर्ण महाराष्ट्रात 1 मे पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. त्याच पार्श्वभुमीवर यापुर्वी पुणे महानगरपालिकेकडून निर्बंधाबाबतचे आदेश जारी करण्यात आले होते. आज मनपाकडून सुधारित आदेश जारी करण्यात आले असून त्यामध्ये काही आस्थापनाच्या कर्मचार्‍यांना कोविड-19 टेस्टमधून सूट देण्यात आली आहे. पुणे मनपाने मद्य विक्रीच्या दुकानांबाबत देखील मोठा निर्णय घेतला आहे. पुणे मनपा हद्दीतील मद्य विक्रीची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलीव्हरी सुविधा (सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत) सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केलेले सुधारित आदेश पुढील प्रमाणे आहेत –

1. सर्व ऑक्सिजन प्रोडयूसर कंपन्यांनी 100 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा फक्त वैद्यकीय कारणासाठी करावा. त्यांनी ऑक्सिजनचा वापर करणारे आणि ऑक्सिजन पुरवठा करणारे यांची यादी प्रसिध्द करावी.

2. पुणे मनपा क्षेत्रात मे. महाराष्ट्र शासनाने ज्या अत्यावश्यक सेवेशी संबंधित उत्पादन करणार्‍या कंपन्यांना परवानगी दिलेली आहे अशा कंपन्यांना आवश्यक मालाचा पुरवठा करणारी दुकाने केवळ त्याच कारणासाठी सुरू ठेवता येतील. त्यांना इतर किरकोळ विक्री करता येणारर नाही. त्यांनी पॉईंट टू पॉईंट विक्री करावी.

3. खाली आस्थापनावरील कर्मचार्‍यांना कोविड-19 (आरटीपीसीआर / आरएटी / ट्रूनॅट / सीबीएनएएटी) चाचणी करण्यापासून सूट देण्यात येत आहे.

अ. ई-कॉमर्स मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी
ब. हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांचे कर्मचारी तसेच त्यांचे मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी
क. खाजगी वाहतूक करणारे वाहन चालक / मालक
ड. दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालीन मासिके, साप्ताहिके इत्यादीची छपाई व वितरण करणारे कर्मचारी
इ.घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणार्‍या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस / नर्स
ई. तथापी, त्यांनी भारत सरकारव्दारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

4. पुणे मनपा क्षेत्रातील खानावळी (मेस) या फक्त पार्सल सेवेसाठी सर्व दिवस सकाळी 7 ते सायंकाळी 8 या वेळेत सुरू राहतील.

5. पुणे मनपा क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलीव्हरी सुविधा – सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहील.

6. चष्म्याची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील.

7. संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

8. पुणे मनपाने यापुर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.