Pune : पुणे महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला ! निम्म्याच केंद्रांवर लसीकरण: तेथेही लस संपल्याने नागरिकांना परत जावे लागले

पुणे – येत्या १ तारखेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार असली तरी सध्या लसींचा पुरवठा पाहाता मोठा गोंधळ उडण्याची चिन्हे आहेत. शहराला मागील दोन दिवसांपासून लसच उपलब्ध झालेली नसल्याने महापालिकेकडील सर्व स्टॉक संपला आहे. त्यामुळे १७२ लसीकरण केंद्रांपैकी जेमतेम निम्म्याच रुग्णालयांत ज्याठिकाणी लस शिल्लक होती, तेथेच किरकोळ संख्येने लसीकरण झाले.

पुणे शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वॉरिअर्स, दुसर्‍या टप्प्यात ६० वर्षावरील नागरिक व ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त, तिसर्‍या टप्प्यात ४५ वर्षे वयावरील नागरिकांच्या लसीकरणास सुरूवात झाली आहे. मागील सव्वातीन महिन्यांत ७ लाख ५० हजार लसीकरण झाले आहे. यामध्ये लसींचे दोन डोस घेतलेल्यांचाही समावेश आहे.

दरम्यान, तीन दिवसांपुर्वी पुणे महापालिकेला काही डोस मिळाले होते. त्यानंतर मात्र मागील दोन दिवसांत पुरवठाच झालेला नाही. शहरात १७२ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. लस नसल्याने आज यापैकी जवळपास निम्मी लसकेंद्र आज लसींअभावी बंद ठेवण्यात आली होती. तर ज्या ठिकाणी लसीकरण करण्यात आले तेथेही जेमतेमच साठा शिल्लक असल्याने अनेकांना परत जावे लागले. यासंदर्भात महापालिकेतील आरोग्य अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता त्यांनी मागील दोन दिवसांत लसींचा पुरवठा झाला नसल्याचे मान्य केले. तसेच संध्याकाळी सहा वाजेेपर्यंत लस उपलब्धतेबाबत शासकिय यंत्रणांकडूनही संपर्क झालेला नाही.