पुण्याच्या कोंढव्यातील 3 वर्षाच्या पुर्वीच्या खूनप्रकरणाला फुटली वाच्या, आरोपी झाले गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात 2017 मध्ये महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याबाबत AD दाखलकरून लपविलेल्या खुनाचा उलघडा आता 3 वर्षांनंतर पुन्हा समोर आला आहे. लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडल्याने त्यांच्याकडून या खुनाची कबुली मिळाली आहे. त्यामुळे त्या तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे महाविद्यालयीन तरुणाचे वडील येरवडा कारागृहातच पोलीस म्हणून नोकरीस होते. तत्कालीन कोंढवा पोलिसांनी नेमकी यात अकस्मात मृत्यूची नोंद का केली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

निखील अनिल लोंढे (वय २४, रा. कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी इमरान रौफ शेख (वय २०), अहमद आयुब खान (वय २५) आणि वसिम अजमल खान (वय ३०, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोंढव्यातील शिवनेरीनगर परिसरातील मैदानात घडली होती.

कोंढव्यातील शिवनेरीनगर परिसरात असलेल्या पारसी मैदानात २८ ऑगस्ट २०१७ मध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. श्वानाने त्याचा मृतदेह खाल्यामुळे त्याची ओळख पटली नव्हती. परंतु, त्याच्या डोक्यात मार लागला होता. मात्र, यानंतर देखील तत्कालीन तपासी अधिकाऱ्यानी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यामुळे या तरुणाच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यातच राहिले.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वी कोंढवा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात वसिमला अटक केली. चौकशीत त्याने लुटमार करण्याच्या उद्देशाने २८ ऑगस्ट २०१७ मध्ये तिघा साथीदारांच्या मदतीने निखीलला रिक्षात बसवून कोंढव्यातील पारसी मैदानात नेले. त्याच्याकडील रक्कम, ऐवज काढून घेण्याचा प्रयत्न करीत असताना निखीलने विरोध केल्यामुळे चौघांनी त्याच्या डोक्यात दगड मारुन खून केल्याची कबुली दिली. त्यांनतर याची माहिती घेण्यात आली. त्यावेळी याबाबत ईडी दाखल असल्याचे समोर आले. त्यावेळी पोलिसही आवक झाले.

पोलिसांनी इमरान, अहमद, वसिमला अटक केली आहे. खून प्रकरणातील चौथा आरोपी शाहरूख उर्फ खड्या नूर हसन खान (वय २९, रा. कोंढवा ) याचा खून झाला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक ए. बी. पाटील अधिक तपास करीत आहेत.

ही कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, पोलस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन मोरे, तपास पथकातील अंमलदार संतोष नाइृक, अमित साळुंके, ज्योतिबा पवार, निलेश वणवे, संजीव कळंबे, सुशिल धिवार, किशोर वळे, उमेश शेलार, आदर्श चव्हाण आणि किरण मोरे यांच्या पथकाने केली.

खूनाची नोंद आकस्मत मृत्यूची…

डोक्यात दगड मारुन खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्यानंतरही कोंढवा पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद कशी केली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात कोंढवा पोलिसांनी हात वर केले असून, माहिती नसल्याचे सांगितले.

निखिल महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तर त्याचे वडील अनिल लोंढे हे महाराष्ट्र पोलीस दलात कारागृह विभागात नोकरीस होते. येरवडा कारागृहातून त्यांची बदली कोल्हापूर येथे झाली. नुकतेच ते निवृत्त झाले आहेत. सध्या ते रिक्षा चालवतात अशी माहिती देण्यात आली.

You might also like