पिंपरीतून कर्नाटकाकडे निघालेल्या कामगारांना खडकीत पोलिसांनी पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड शहरातून कर्नाटकात नागरिक घेऊन जाणारे ट्रक खडकी पोलिसांनी रात्र गस्ती दरम्यान पकडले आहे. यावेळी 45 नागरिक मिळाले असुन, सर्वजण कामगार आहेत. खाण्या-पिण्याचे हाल होऊ लागल्याने हे नागरिक गावी जात असल्याचे सांगत आहेत.

याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात याघटनेची नोंद करण्यात आली आहे. तपासानंतर ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराने सर्वच नागरिक भयभीत झाले आहेत. देश लॉकडाऊन असल्याने अनेकांची अडचण झाली आहे. कामगार वर्ग यात भरडला जात असून, त्यांना राहण्यासोबच जेवण्याची तारांबळ उडाली आहे. दरम्यान मेट्रोसिटी असणाऱ्या मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यासह परगावचे हजारो नागरिक काम करत आहेत. मात्र, कोरोना आजाराच्या भीतीने हे नागरिक आप-आपल्या गावी जात आहेत. अनेकांनी पाईच वाट धरली आहे. तर अनेकजन मिळेल त्या वाहनाने जात आहेत. ट्रक चालकांनी हा धंदाच सुरू केला आहे.

दरम्यान खडकी पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक कोळी व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी बोपोडी चौकात नाकाबंदी वेळी एक ट्रॅक्टर व टेम्पो आढळून आला. त्यांना थांबून तपासणी केली असता दोन वाहनांमध्ये नागरिक मिळाले. त्यांची चौकशी केली. त्यावेळी ते पिंपरीतील कामगार आहेत. ते कर्नाटक राज्यातील आहेत. कोरोनामुळे कामे बंद झाली आहेत. त्यांना कामे मिळत नाहीत. त्यामुळे खाण्या-पिण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे गावी जात आहेत, असे समजले.

त्यानंतर खडकी पोलीसांनीच त्यांच्या राहण्याची सोय येथील एका औंध पोलीस लाईन येथील एका शाळेत केली. त्यानंतर त्यांच्या जेवण्याची सोय देखील करण्यात आली आहे. त्यामुळे या कामगारांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

You might also like