पुणे ग्रामीणमधील तो पोलिस अधिकारी अन् कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

नारायणगाव/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि दोषारोपपत्र लवकर दखल करण्यासाठी लाचेची मागणी केल्या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन केशव घोडे-पाटील (वय-38 रा. नारायणगाव) आणि पोलीस नाईक धर्मात्मा कारभारी हांडे या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दोघांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

त्यांच्या निलंबनाचे आदेश आज (बुधवार) काढण्यात आले. नारायणगाव येथील एका सावकाराला गुन्ह्यात जामीन देण्यासाठी आणि इतर दोघांना आरोपी न करण्यासाठी घोडे पाटील यांनी पाच लाख रुपयाची लाचेची मागणी केली होती. याबातची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्याची 7 ऑगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली होती. त्यावेळी घोडे पाटील याने हांडे याच्या मार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या दोघांवर नारायणगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात केला.

याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील आणि पोलीस नाईक हेमंत हांडे यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित केले. घोडे पाटील यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हमेंत हांडे याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही अंतर्गत निलंबित केले आहे.