Pune : मोफत लसीकरणाच्या हव्यासापोटी तरुणाईची ‘फरफट’; नोंदणीच करता येत नसल्याने लाखो तरुणतरुणींचा होतोय ‘संताप’

पुणे : केंद्र सरकार, राज्य शासनाने सर्वांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली असली तरी लसच उपलब्ध नसल्याने सध्या सर्वत्र गोंधळ उडत आहे. राज्यातील अनेक शहरात ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांची लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. त्यात लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक करण्यात आली असल्याने व ही नोंदणी रात्री ८ वाजता ऑनलाईन बुकिंगद्वारे करावी लागते. बुकींग करणारे लाखो आणि लस उपलब्ध केवळ एक हजार अशा व्यस्त प्रमाणामुळे काही मिनिटातच नोंदणी पूर्ण होत आहे. त्यामुळे दररोज हजारो तरुणांचा संताप होत असल्याचे दिसून येत आहे. केवळ लोकानुनयासाठी मोफत लसीकरणाच्या घोषणेमुळे तरुणाईची मात्र फरफट होत असल्याचे दिसून येत आहे.

पुणे शहरात १८ ते ४४ वयोगटातील २२ लाख तरुणांची नोंद झाली आहे. हा गट कामानिमित्ताने बाहेर पडत असल्याने त्याचे लसीकरण होणे अतिशय महत्वाचे आहे. परंतु, या तरुणांच्या लसीकरणासाठी सध्या केवळ हजार ते २ हजार लसी उपलब्ध असतात. १ मेपासून आतापर्यंत केवळ १३ हजार तरुणांचे लसीकरण झाले आहे. सध्या ४५ वर्षांपुढील लोकांच्या दुसर्‍या व पहिल्या डोसला प्राधान्य देण्यात येत असल्याचे तरुणांच्या लसीकरणाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. आज मंगळवारी पुणे महापालिकेला २६ हजार डोस उपलब्ध झाले. त्यापैकी केवळ १ हजार डोस हे १८ ते ४४ वयोगटासाठी ठेवण्यात आले आहे.

मोफत लसीकरणाची घोषणा झाल्यानंतर लसीचा कायमच तुटवडा दिसून आला आहे. त्यामुळे शहरातील सर्व खासगी रुग्णालयातील लसीकरण बंद झाले आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लोकांना महापालिकेचे लसीकरण केल्याचा शोध घेत शहरभर फिरण्याची वेळ आली आहे. त्यात लस नसल्याने अनेकांना हेलपाटे मारावे लागत आहे. आम्हाला मोफत नको, तर माफक दरात घराजवळच्या हॉस्पिटलमध्ये लस उपलब्ध करुन द्या. खासगी हॉस्पिटलमधील लसीकरण सुरु करा, आमची पैसे देण्याची तयारी आहे, अशी मागणी तरुणांकडून होत आहे.