Pune : पुणे जिल्हा परिषदेमधील अधिकारी 20 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  जिल्हा परिषदेत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील लेखापालास 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे.

विजय मधुकर चितोडे (वय 45) असे रंगेहात पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विजय हे पुणे जिल्हा परिषद येथे लेखापाल आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानात सध्या ते काम करत आहेत. दरम्यान, यातील तक्रारदार यांच्या कंपनीला ‘पोस्ट कोविड 19’ चे फॉर्म व ऊस तोडणी कामगार आरोग्य तपासणी पत्रिका छापण्याचे काम मिळाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांचे बिल अडकले होते. त्याचे बिल काढण्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा कारवाईत तडजोडीअंती 20 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे.