Pune-Purandar Airport | पुरंदर विमानतळ प्रकल्पाचे काम 2 वर्षापासून बंदच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune-Purandar Airport | पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम गेल्या दोन वर्षांपासून बंदच झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने विमानतळाची जागा बदलण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय विद्यमान राज्य सरकारने फिरविला असून त्याबाबतची घोषणा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सासवड येथील जाहीर मेळाव्यात केली. मात्र, प्रकल्पाबाबत नव्या सरकारकडूनही अद्याप कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यात आले नसल्याने या प्रकल्पावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Pune-Purandar Airport)

 

पुणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी, मुंंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या सात गावांमधील सुमारे तीन हजार हेक्टर जागा निश्चित करण्यात आली. प्रकल्पासाठी आवश्यक केंद्र शासनाच्या संरक्षण, भारतीय हवाई दल, वन अशा अनेक विभागांच्या परवानग्या मिळाल्या होत्या. प्रकल्पामुळे जमीन जाणाऱ्या सात गावांतील जागेची मोजणी करून प्रकल्पग्रस्तांचे पूनर्वसन किंवा देण्यात येणाऱ्या मोबदल्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रकल्पबाधितांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्यात येईल, प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळावा म्हणून त्यांच्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला होता. तसेच विमानतळ विकासासाठी महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) नियुक्त करून निधी देखील देण्यात आला. मात्र, राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विमानतळाच्या जागेत बदल करण्यात आला. तसेच कोरोनामुळे या काळात प्रकल्पाबाबत काहीच हालचाल होऊ शकली नाही. त्यानंतर नव्या जागेला संरक्षण मंत्रालयाकडून नकार कळविण्यात आला. त्यामुळे नव्या जागेवर विमानतळ होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. (Pune-Purandar Airport)

 

दरम्यान, स्थानिक प्रशासकीय पातळीवर जमीन मोजणी, कागदपत्रांची पाहणी किंवा त्यासंबंधी करण्यात येणारी कामे बंद करण्यात आली आहेत.
तसेच एमएडीसीकडून भूसंपादनाबाबत लागणारी कागदोपत्री प्रक्रियांचे काम देखील पूर्णत: बंद करण्यात आले आहे.
राज्य सरकारी पातळीवर देखील अद्याप कुठल्याच प्रकारचा पुढाकार घेण्यात येत नसल्याने विमानतळाचा प्रश्न पुन्हा रखडला आहे.

 

पुरंदर विमानतळाबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून सध्या कोणत्याही प्रकारचे काम सुरू नाही. प्रकल्पाबाबत सुरू असलेली कामे मागेच बंद करण्यात आली आहेत.
प्रकल्पाबाबत राज्य शासनाकडून सूचना येत नाहीत, तोवर ही कामे सुरू करता येणार नाही.
राज्य शासनाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
दीपक नलावडे, विभागीय अधिकारी, एमएडीसी

 

प्रत्यक्षात प्रगती नाहीच

महाविकास आघाडी सरकार जाऊन नवे राज्य सरकार सत्तेत आल्यानंतर पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी विमानतळ प्रकल्प पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील जुन्याच जागी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सासवड येथील जाहीर मेळाव्यातही याबाबतची घोषणा केली.
मात्र, प्रत्यक्षात प्रकल्पाबाबत काहीही प्रगती झालेली नाही.

 

Web Title :- Pune-Purandar Airport | The work of Purandar Airport project has been stopped since 2 years

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा