Pune : रेल्वेत प्रवास करणाऱ्या वकिलाजवळील पिशवी चोरणाऱ्यास लोहमार्ग पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वेत प्रवास करणाऱ्या वकिलाजवळील पिशवी चोरणाऱ्यास लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने व मोबाइल असा पावणेसात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. योगेश रमेश माने (वय २७,रा. गौतमनगर, दौंड, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यातील तक्रारदार हे वकील असून, ते जबलपूर-पुणे दरम्यान रेल्वेने प्रवास करत असताना त्यांच्याजवळ पिशवी पळवली होती. पिशवीत सोन्याचे दागिने व मोबाइल होता.

याप्रकरणाचा लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास करत होता. तपासात माने याने पिशवी चोरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून पकडण्यात आले. त्याच्याकडून १४० ग्रॅम सोन्याची लगड, मोबाइल असा ऐवज जप्त केला आहे.

माने हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर पुणे, अहमदनगर तसेच दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील, अतिरिक्त अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय आधिकारी श्रीकांत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मौला सय्यद, सहाय्यक निरीक्षक बी. एस. अंतरकर, वाय. एस. कलकुटणे, दांगट, मदे, भोसले, थोरात आदींनी ही कारवाई केली.