Pune : हडपसर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या, भाजीवाल्यांची तारांबळ तर साईडपट्ट्यावरून दुचाकी घसरल्या

पुणे :  प्रतिनिधी –   मागिल दोन दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिसाला दिला. बुधवारी (दि. 17 जून) दिवसभर उकाडा जाणवत होता. दुपारी आकाशामध्ये ढग जमा झाले आणि साडेतीनच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दुपारी कोसळलेल्या पावसामुळे भाजीविक्रेत्यांची तारांबळ झाली.

हडपसर आणि परिसरामध्ये सर्वत्र पावसाच्या सरी कोसळल्या आणि रस्त्यावरून पाणी वाहू लागले. रस्त्याच्या साईडपट्ट्या चिखलमय झाल्यामुळे दुचाकी घसरडून पडल्याच्या काही घटना घडल्या. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी आहे. त्यातच दुपारची वेळ असल्यामुळे वाहतुकीला कुठलाही अडथळा झाला नाही.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर लगेचच चक्री वादळाने धुमाकूळ घातला. त्यामुळे उभ्या पिकासह घरादारांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मंत्र्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावांबरोबर शेतात भेटी देऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. प्रशासनाला तातडीने पंचनामे करून माहिती पाठविण्यास सांगितल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आता पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहावे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

जून महिन्यात दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शाळा-महाविद्यालये सुरू होतात. मात्र, कोरोना विषाणूमुळे अद्याप शाळा-महाविद्यालये सुरू झाली नाहीत. त्यामुळे मुलांसाठी रेनकोट खरेदी करण्यासाठी अद्याप तरी दुकानांमध्ये पालकवर्गाची गर्दी दिसत नाही. तसेच लॉकडाऊन शिथील केल्यामुळे कामगारवर्ग घराबाहेर पडू लागला आहे. दुकाने, हॉटेल्स सुरू झाली असली तरी अद्याप पाहिजे तेवढी गर्दी दिसत नाही.