Pune : ‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –    हडपसर पंचक्रोशीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमालीची वाढत आहे. त्यामुळे कोरोनाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. विकेंडचा कडक लॉकडाऊन आणि कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला. सायंकाळी चारच्या सुमारास आकाशामध्ये ढग दाटून आले, सोसायट्याचा वारा सुटला आणि पावसा हलकीशी सुरुवात केली. हडपसर, रामटेकडी, मुंढवा, केशवनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची, लोणी काळभोर, उरुळी कांचन, मांजरी आदी परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

कोरोनाच्या भीतीने नागरिकांची गाळण उडाली आहे. त्यामुळे अनेकांनी घरामध्ये थांबणे पसंत केले आहे. मात्र, कडाक्याच्या उन्हामुळे घरामध्ये घामाच्या धारा लागत आहे. पंख्याची हवाही गरम चालत आहे. कुलर आणि एस.सी.ची हवासुद्धा थंडावा देत नसल्याची अनेकांनी तक्रार केली. मागिल दोन दिवसांपासून बाजारपेठा बंद असल्याने सर्व दुकाने बंद होती. कोरोनामुळे उद्याने बंद असल्यामुळे लहानग्यांना बागेतही नेता येईना, अशी बिकट अवस्था झाली आहे. मात्र, सोमवारी (दि.12 एप्रिल) सायंकाळी पावसामुळे ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात होते.