Pune : उकाड्याने हैराण झालेल्या उपनगरवासियांना पावसाचा दिलासा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार-रविवारच्या पाचव्या विकेंडला वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. मागिल चार-पाच दिवसांपासून कडक उन्हामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. वादळी वाऱ्यामुळे  परिसरातील फ्लेक्स आणि होर्डिंग्जबरोबर वृक्षही जमीनदोस्त झाले. अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही. दुपारी दोन आणि सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवार सुटीचा आणि कडक निर्बंध असल्याने नागिरकांनी घरात बसून वादळी वारे आणि पावसाचा आनंद लुटला.

हडपसर, रामटेकडी, केशवनगर, मुंढवा, घोरपडी, मांजरी, शेवाळेवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची, लोणी काळभोर, उरुळी कांचन परिसरात शनिवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर रविवारीही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (शनिवार-रविवार) विकेंड बाजारपेठ बंद असल्याने तोडणीयोग्य भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनाने भाजीपाला मार्केट सुरू ठेवले पाहिजे, अशी मागणी शेतकरीवर्ग करू लागला आहे.

कोरोना महामारीमुळे मागिल दोन महिन्यांपासून नागरिक कमालीचे त्रासले आहेत. नातेवाईकांसह मित्र, शेजाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात त्यांची दमछाक होत आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड आणि रेमडिसिव्ह इंजेक्सन मिळत नाही, अशी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले असल्यामुळे प्रत्येकजण घराबाहेर पडण्यास नकार देत आहे. त्यातच काल (शनिवार)पासून अवकाळी पावसाने हजेरी सुरू केली आहे. वातावरणात मोठा बदल झाला आहे, त्यामुळे थंडी-ताप, अंगदुखीचे आजार वाढतात की काय, अशी भीतीही सतावू लागली आहे.

दरम्यान, मांजरी खुर्दमधील शेतकरी अशोक आव्हाले म्हणाले की, कोलवडी, आव्हाळवाडी, केसनंद, वाघोली, वाडेबोल्हाई, साष्टे, लोणी काळभोर, थेऊर, फुरसुंगी, साडेसतरानळी, केशवनगर परिसरात सोसाट्याच्या वादळामुळे आंब्याचे नुकसान झाले. काही ठिकाणी वीज अखंडित झाला होता, असे त्यांनी सांगितले.