Pune : उकाड्याने हैराण झालेल्या उपनगरवासियांना हलक्या पावसाचा दिलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मागिल आठवड्यापासून उकाड्याने हैराण झालेल्या उपनगरवासियांना सायंकाळी झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. दुपारी साडेचारच्या सुमारास आकाशामध्ये ढग दाटून आले आणि हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध असल्यामुळे बाजारपेठा बंद असल्याने दुचाकी आणि मोठी वाहने वगळता रस्त्यावर शुकशुकाट होता.

हडपसर, रामटेकडी, मुंढवा, केशवनगर, साडेसतरानळी, मांजरी, शेवाळेवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची, लोणी काळभोर, उरुळी कांचन आदी परिसरात आज पावसाने हजेरी लावली. मागिल आठवड्यापासून कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. दररोज सायंकाळी आकाशामध्ये ढग दाटून येत होते. मात्र, सोसाट्याचा वारा सुटला की ढग वाहून जात होते. पाऊस हुलकावणी देत असल्याने नागरिक उकाड्याने त्रासले होते. दिवसभर घरामध्ये पंख्याची गरम हवा आणि अंगामधून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. आज सायंकाळी झालेल्या हलक्या पावसाच्या सरींमुळे नागरिक सुखावल्याचे पाहायला मिळाले.