Pune : उरुळीकांचन परिसराला पावसाने झोडपले ! भाजीपाला, उस, आंब्याचे नुकसान, झाडांची पडझड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल आठवड्यापासून उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले होते. आज (मंगळवार, दि. २५ मे, २०२१) दुपारी साडेतीनच्या सुमारास आकाशामध्ये ढग दाटून आले आणि सोसायट्याच्या वाऱ्याबरोबर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पावसामुळे भाजीपाला, आंबा, ऊसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. झाडांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

उरुळी कांचन, कोरेगाव मूळ, अष्टापूर, भवरापूर, सोरतापवाडी, शिंदवणे, खामगाव, टिळेकरवाडी, कासुर्डी, डाळिंब गाव, तरडे, वळती परिसरात सोसायट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाटात एक तास पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे उभ्या पिकामध्ये पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने चांगलाच दिलासा दिला.

कोरेगाव मूळ येथील सचिन कड आणि उरुळी कांचनमधील शेतकरी पंडित कांचन, वळतीचे संतोष घोलप, नायगावचे राजेंद्र चौधरी शेतकरी यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे शेतमालासाठी बाजारपेठ ठराविक वेळेत उपलब्ध होते. त्यामुळे विकण्यात अनेक अडचणी येतात. त्यातच आज जोरदार पावसामध्ये काढणीयोग्य आलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोसायट्याच्या वाऱ्यामुळे उसाचे पिक आडवे झाले, तर आंब्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले. काढणीयोग्य झालेल्या भाजीपाल्यामध्ये पाणी साचले. शेतातील सऱ्या फुटल्याने भाजापीला वाहून गेला. शेतमालाला भाव मिळत नसल्याने बियाणे आणि मशागतीचाही खर्च निघत नाही. त्यातच अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने भाजीपाला पिके घ्यायलाच नकोत, अशीच मानसिकता शेतकरी वर्गातून होत असल्याचे बोलले जात आहे.