बिबटयांच्या पिल्‍लांची तस्करी करणार्‍या पुण्यातील तिघांना अटक ; 2 पिल्‍लांची सुखरूप सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिवंत बिबटयांच्या पिल्‍लांची तस्करी करणार्‍या तिघांना राजगड पोलिसांनी अटक केली असुन त्यांच्या ताब्यात असलेल्या 2 जिवंत बिबटयांच्या पिल्‍लांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी सकाळी खेड-शिवापूर टोलनाक्यावर करण्यात आली आहे.

मुन्‍ना हबीब सय्यद (31, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, पुणे), इरफान मेहमुद शेख (33, रा. कोंढवा) आणि आय्याज बक्शुलखान पठाण (40, रा. घोरपडी पेठ, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, खेड-शिवापूर टोलनाक्यावरून एमएच 12 आरएफ 1000 या क्रमांकाची कार सातार्‍याहून पुण्याकडे संशयितरित्या येत होती. त्यावेळी कारचालकाकडे वाहन परवान्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी कारमधून प्राण्याचा आवाज येत होता. कारची तपासणी केली असता त्यामध्ये प्लास्टिकच्या बास्केटमध्ये बिबटयाची 2 जिवंत पिल्‍ले आढळून आली. पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली. त्यांनी ते पिल्‍लं कुठुन आणली होती, ते कोणाला त्याची विक्री करणार होते याबाबत सखोल तपास चालु असल्याची माहिती राजगड पोलिसांनी दिली आहे.