खंडणी प्रकरण : पत्रकार जैन, बडतर्फ पोलिस जगताप आणि रविंद्र बर्‍हाटे यांच्याविरूध्द पोलिसांकडे हडपसर, बाणेर आणि सिंहगड रोड परिसरातून आणखी 3 तक्रारी, प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप आणि आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बराटे यांच्याविरोधात आणखी 3 तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. जमीन आणि पैसे घेऊन पिस्तुल दाखवत धमकावले असल्याच्या स्वरूपातील या तक्रारी आहेत. यामुळे पोलीस दलासह शहरात खळबळ उडाली आहे.

धमकावत डोक्याला पिस्तुल लावत खंडणीप्रकरणी पत्रकार देवेंद्र जैन बडतर्फ पोलीस शैलेश जगताप आणि आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बराटे तसेच महिला व अमोल चव्हाण यांच्या विरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दुसरा गुन्हा समर्थ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या फसवणूक व खंडणीच्या गुन्ह्यात सध्या 6 जण अटकेत आहेत. दरम्यान, कोथरूड पोलिसांनी तिघांकडून कोट्यावधी रुपयांचे जमीनीचे कागदपत्रे जप्त केली होती. त्याचा तपास सुरू असताना त्यांनी या आरोपींबाबत तक्रार असल्यास किंवा त्यांचे पैसे व जमिनीचे कागदपत्रे घेतली व ते परत देत नसतील तर तक्रार करण्याचे आवाहन वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी पुण्यातील सर्व नागरिकांना केले होते.

यानंतर शहरातील आणखी तीन जागेंची प्रकरणे समोर आले आहेत. जैन, जगताप आणि बराटे यांनी जमिनीचे कागदपत्रे घेतल्याचे म्हंटले आहे. तक्रारी देणार्‍यांना डोक्याला पिस्तुल लावून जमिनीचे कागदपत्रे घेऊन पैसे घेतले अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. हडपसर, बाणेर आणि सिंहगड रोड परिसरातील या तक्रारी आहेत. या परिसरातील जमिनीचा बाजार भाव कोट्यवधी रुपयांचा आहे. त्यांच्या तक्रारी घेऊन त्या वरिष्ठांना देण्यात येणार आहेत. चौकशी नंतर त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक जोशी यांनी सांगितले. दरम्यान आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.